गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

कोरची तालुक्यात मलेरियाचा प्रकोप ; आणखी दोन युवकांचा मृत्यू

कोरची : तालुक्यात मलेरियाचा प्रकोप अजूनही कायम असून मलेरियाने आणखी दोन युवकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील दवंडी येथील एका विवाहित युवकाचा मलेरियाने मृत्यू झाला आहे. शिवाय भिमपूर येथील युवकानेही हिवतापामुळे अखेरचा श्वास सोडला आहे. २४ जुलैला एकाच दिवशी या घटना घडल्या. विशाल भारत रक्षा (२६) रा. दवंडी, धर्मपाल बळीराम पुजेरी (२५) रा. भिमपूर अशी मृतांची नावे आहेत.

विशाल रक्षा यास बरे वाटत नव्हते. त्यामुळे तेथील आशा वर्करने त्याला १८ जुलैला हिवतापाच्या गोळ्या दिल्या. परंतु विशालची प्रकृती आणखीनच खराब होत गेल्याने १९ जुलैला त्याला गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील डॉ. धुमनखेडे यांच्याकडे नेण्यात आले. पुढे त्याला देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याच दिवशी रात्री १२ वाजता त्याला गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. २४ जुलैपर्यंत तो तेथेच भरती होता. परंतु प्रकृती आणखीनच बिघडल्याने त्याला नागपूरला हलविले. परंतु बहेकार रुग्णालयात २५ जुलैला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

कोरची तालुक्यात दिवसेंदिवस मलेरियाचा प्रकोप वाढत आहे. या तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयात दररोज ५० हून अधिक मलेरिया पॉझिटीव्ह रुग्ण आढळत आहेत. परंतु रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याने रुग्ण दगावण्याच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे.

यापूर्वी कोटगूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एडजाल येथील शिवांगी नैताम या चार वर्षीय बालिकेचा २९ जुलैला मृत्यू झाला. त्यापूर्वी याच केंद्रांतर्गत गोडरी येथील प्रमोद नैताम (६), त्याची बहीण करिश्मा नैताम (८) यांचा १० मार्च रोजी मलेरियाने मृत्यू झाला. त्याही आधी आलोडी येथील आरती कुंजाम या दीड महिन्याच्या बालिकेचा मलेरियाने मृत्यू झाला होता. वाको येथील बाली भुवन गंगासागर या दीड महिन्याच्या बालिकेनेही मलेरियामुळे प्राण सोडला होता.

या तालुक्यात कोटगूल आणि बोटेकसा या दोन ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. तालुक्यात मानसेवी डॉक्टर आणि सीएचओ डॉक्टर मोठ्या प्रमाणात असून आरोग्यवर्धीनी या ठिकाणी काम करताना दाखविण्यात येते. परंतु डॉक्टर महिन्याकाठी एखा‌द्या दिवशीच येतात, असे गावकरी सांगतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button