
कोरेगाव येथे शिवमंदिराजवळ घडली दुर्घटना; चालकाचे दुर्लक्ष ठरले जीवावर
गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून एका ५ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (५ जून) दुपारी पावणे एक वाजता घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बनपूरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
लकी रवी बनपूरकर (वय ५) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. कोरेगाव येथे बनपूरकर कुटुंब मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवते. त्यांचा पाच वर्षांचा मुलगा लकी हा घराशेजारील शिवमंदिरात ट्रॅक्टरजवळ खेळत होता. गोविंदा ठाकरे हा स्वतःच्या ट्रॅक्टरने शेतीकामासाठी जात होता. त्याने ट्रॅक्टर सुरू करण्यापूर्वी आणि पुढे घेण्यापूर्वी ट्रॉलीजवळ कोणी आहे का, हे पाहिले नाही. याच दुर्लक्षामुळे, ट्रॅक्टरची ट्रॉली आणि मंदिराचा खांब यांच्यामध्ये लकी अडकला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. लकीचा मृतदेह पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवला. ट्रॅक्टरचालक गोविंदा ठाकरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेने बनपूरकर कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, सायंकाळी लकीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.



