
तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा
कुरखेडा : कुरखेडा शहरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून होत असलेल्या गढूळ, दूषित आणि अस्वच्छ पाणीपुरवठ्याच्या गंभीर प्रश्नाने अखेर जनआक्रोशाचे रूप धारण केले आहे. “स्वच्छ पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे, प्रशासनाचा उपकार नाही,” अशी ठाम भूमिका घेत संतप्त नागरिकांनी नगर पंचायत प्रशासनाला सविस्तर निवेदन सादर केले. दूषित पाण्याच्या समस्येवर तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
नगर पंचायतीचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना सादर केलेल्या निवेदनात नागरिकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरात नळाद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यासंदर्भात वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनही नगर पंचायत प्रशासनाने या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळणाऱ्या या उदासीनतेमुळे शहरात संतापाची लाट आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने दूषित पाण्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाणी पिण्यामुळे शहरात जलजन्य आजारांची मोठी साथ किंवा महामारी पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. भविष्यात आरोग्याची अशी कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नगर पंचायत प्रशासनाची राहील, असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेची तातडीने तांत्रिक तपासणी करण्यात यावी. जलशुद्धीकरण केंद्रावर आधुनिक ‘वॉटर प्युरिफिकेशन सिस्टीम’ व प्रभावी ‘क्लोरीनेशन’ व्यवस्था कार्यान्वित करावी. पाण्याची नियमित प्रयोगशाळा तपासणी करून त्याचा अहवाल नागरिकांसाठी सार्वजनिक करावा. पाणीपुरवठ्यासारख्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या निवेदनानंतरही जर प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत, तर नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन, उपोषण, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, सार्वजनिक आरोग्य विभाग व महाराष्ट्र शासनाकडे थेट तक्रार करण्यात येईल, तसेच गरज पडल्यास न्यायालयीन लढा उभारण्यात येईल, असे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.
निवेदन सादर करताना ईश्वर ठाकूर, अनाकुरे, दीपक धारगाये, हेमंत नरोटे, चेतन मैद, शहेजाद हाशमी, एजाज शेख, भावेश मुंगणकर आणि गोलू चांदेवार यांच्यासह कुरखेडा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुरखेडा शहरातील स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता केवळ एक तक्रार राहिलेली नसून, तो सार्वजनिक आरोग्याशी निगडित अत्यंत संवेदनशील विषय बनला आहे. त्यामुळे आता नगर पंचायत प्रशासन यावर किती तातडीने आणि प्रभावीपणे निर्णय घेते, याकडे संपूर्ण कुरखेडावासीयांचे लक्ष लागले आहे.



