गोंदियाविदर्भ

एसआयआर मोहिमेला वेग देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक : 48% डिजिटायझेशन पूर्ण – जिल्हाधिकारी

गोंदिया: मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरावलोकन (SIR) मोहिमेला अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सक्रिय झाले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.१६) जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची एक अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मोहिमेच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला, तसेच ही मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

बैठकीत माहिती देताना जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी सांगितले की, गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत मतदार यादीशी संबंधित सुमारे ४८ टक्के डिजिटायझेशनचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही वेगाने सुरू आहे. या बैठकीत उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेची सविस्तर तांत्रिक माहिती देण्यात आली, तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या कामकाजाची रूपरेषा आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या आढावा बैठकीदरम्यान मतदार नोंदणी व दुरुस्ती प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना येणाऱ्या विविध अडचणी आणि तांत्रिक समस्या जाणून घेण्यात आल्या व त्यावर सकारात्मक चर्चा झाली. नागरिकांच्या आणि प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन करण्यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेली ‘FAQ’ (नेहमी विचारले जाणारे प्रश्न) संदर्भातील विशेष माहिती पुस्तिका सर्व उपस्थित प्रतिनिधींना वितरित करण्यात आली.

मतदार यादी अधिक पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करावे, तसेच जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी आपली आवश्यक माहिती वेळेत सादर करून या राष्ट्रीय कार्यात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button