
नागपूर : उपराजधानीतील सीताबर्डी रामदासपेठ परिसरातील नामांकित ‘हॉटेल सेंटर पॉईंट’मध्ये सुरू असलेल्या एका ड्रग्ज पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून तिघांना रंगेहाथ अटक केली आहे. अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी गोंदिया शहरातील रहिवासी असून, ते हॉटेलच्या खोलीत ‘एमडी’ (मेफेड्रोन) या अमली पदार्थाचे सेवन करत होते. मयंक अग्रवाल (वय ३०, रा. गणेशनगर), पराग अग्रवाल (वय ३१, रा. सिव्हिल लाइन्स) आणि कुणाल नखाते (वय ३१, रा. सिव्हिल लाइन्स) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी हे तिघेही गोंदियाहून नागपुरात आले होते आणि हॉटेल सेंटर पॉईंटमधील चौथ्या माळ्यावरील एका खोलीत मुक्कामास होते. खोलीतच त्यांनी ड्रग्ज पार्टीचे आयोजन करून एमडीचे सेवन सुरू केले. या हायप्रोफाईल पार्टीबाबत नागपूरच्या पोलीस उपायुक्त (DCP) अन्नपूर्णा सिंग यांना खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली. त्यांनी तातडीने सीताबर्डी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले.
डीसीपी अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांच्या नेतृत्वातील पथकाने मंगळवारी रात्री हॉटेलच्या खोलीवर अचानक छापा टाकला. यावेळी तिघेही अमली पदार्थाचे सेवन करताना रंगेहाथ पकडले गेले. पोलिसांनी त्यांच्याकडून १.६४० ग्रॅम एमडी जप्त केली आहे. तपासात त्यांनी ही एमडी गोंदियातील एका तस्कराकडून अडीच ग्रॅम खरेदी केल्याची कबुली दिली.
बुधवारी पोलिसांनी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या कारवाईमुळे नागपूर आणि गोंदिया दोन्ही शहरांतील ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले असून, गोंदियातील त्या मुख्य तस्कराचा शोध आता पोलीस घेत आहेत.



