महाराष्ट्रमुख्य बातमीमुंबई

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर थेट बदलापूर पोलीस ठाण्यात

पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली सविस्तर माहिती

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बदलापूर : बदलापूरमध्ये घडलेली घटना ही अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला कळीमा फासणारी आहे. याप्रकरणी दोषी असलेले मुख्याध्यापक, शिक्षिका संस्थाचालक यांच्यावर गुन्हे दाखल करावा. तसेच उच्च न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण हे गृहखात्याला चपराक आहे. नैतिकता, नीतिमत्ता थोडी जरी असेल तर न्यायालयाचे निरीक्षण पाहून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

वडेट्टीवार यांनी बदलापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिका-यांकडून घटनेची आज माहिती घेतली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी असलेल्या मुख्याध्यापक, शिक्षिका आणि संस्थाचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आम्ही मागणी केली आहे. १५ तारखेला मुख्यमंत्री येणार म्हणून बदलापूरमधील घटना लोकांमध्ये जाऊ नये यासाठी प्रयत्न झाले.

इतकंच नाही तर शाळेत असं काही होऊ शकत नाही, ही घटना शाळाबाहेर झाली असेल किंवा सायकल चालवताना घडले असेल, असे शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षिकेने पीडित मुलीच्या पालकांना सांगितले. या प्रकरणी पोलिसांकडे जाऊ नका, असाही दबाव त्यांच्यावर टाकण्यात आला. या संस्थेने पुरावे नष्ट केले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. तसेच सीसीटीव्ही फुटेज कुठे आहेत, असा सवालही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे गुन्हा लपवणारे देखील गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

वडेट्टीवार म्हणाले, उज्ज्वल निकम म्हणजे फुलटाईम भाजप कार्यकर्ता आणि पार्ट टाईम वकील आहेत.ते भाजपाची बाजू मांडतील की सत्याची बाजू मांडतील? असा प्रश्न पडतो. त्यामुळे याप्रकरणी आरोपीला वाचवायचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

वडेट्टीवार पुढे म्हणाले, उच्च न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण हे गृहखात्याला चपराक आहे. नैतिकता, नीतिमत्ता थोडी जरी असेल तर न्यायालयाचे निरीक्षण पाहून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button