रुग्णांना भेटण्यासाठी आता पास बंधनकारक
दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भेटता येणार

चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 1 ऑगस्टपासून महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवारपासून (दि. 26) रुग्णांना भेटण्याकरिता नातेवाईकांसाठी पास बंधनकारक करण्यात येणार आहे.
रुग्णालयात रुग्ण भरती झाल्यानंतर फॉर्म भरतेवेळी रुग्णासोबत थांबणाऱ्या नातेवाईकाकडे एक हिरव्या रंगाचा व एक लाल रंगाचा पास देण्यात येईल. हिरव्या रंगाचा पास हा रुग्णाजवळ नेहमी थांबणाऱ्या नातेवाईकांकरीता असेल, तर लाल रंगाचा पास हा रुग्णालय प्रशासनामार्फत भेटीसाठी नेमून दिलेल्या दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत इतर नातेवाईकांना भेटण्याकरीता राहील.
लाल रंगाच्या पासवर एकावेळी एका नातेवाईकाला रुग्णास परवानगी देण्यात येईल. भेटण्याची तसेच आधी गेलेला नातेवाईक परत आल्यानंतर त्याच पासचा वापर करून दुसऱ्या नातेवाईकास आत प्रवेश देण्यात येईल. पासची वैधता 7 दिवसांकरिता राहील. रुग्ण जर 7 दिवसांपेक्षा जास्त कालावधीकरिता भरती राहिल्यास सदर पासवर आंतररुग्ण नोंदणी विभागातून नवीन तारखेचा शिक्का मारून घेणे आवश्यक आहे. तसेच पास हरवल्यास 50 रुपये प्रतीपास दंड आकारण्यात येईल.
दवाखान्यातून सुट्टी मिळाल्यानंतर रुग्णाकडील दोन्ही पास वार्डातील इन्चार्ज सिस्टरकडे जमा करण्यात यावे. त्याशिवाय रुग्णास सुट्टी देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. रुग्णालयाचा आतील व बाहेरील परिसर स्वच्छ राहावा, याकरीता धूम्रपान करणे, पान, गुटखा, खरा व इतर तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणे टाळावे. परिसरात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करताना किंवा थुंकताना आढळल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल.
रुग्णालय परिसरामध्ये विनाकारण चाहेरील वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. फक्त रुग्णांची ने-आण करण्याकरिता मर्यादित वेळेसाठीच बाहेरील वाहनांना प्रवेश दिला जाईल. रुग्णालयातील कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांना वाहन पासेस उपलब्ध करून दिल्या जाईल. पासच्या आधारे त्यांना रुग्णालयात वाहनासह प्रवेश देण्यात येईल.



