भंडाराविदर्भ

जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्रदान पंधरवड्याचे उद्घाटन

भंडारा : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम आणि नेत्र शल्य चिकित्सक डॉ. रेखा धकाते यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा जिल्हा रुग्णालयात ३९ वा नेत्रदान पंधरवाडा २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२४ दरम्यान साजरा होत आहे. या पंधरवड्याचे उद्घाटन न्यायाधीश बिजू गवारे यांच्या हस्ते संपन्न झाले.

26 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता नेत्रदान जनजागृतीसाठी प्रभातफेरीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या नेत्र विभागात न्यायाधीश गवारे यांच्या हस्ते लाल फित कापून पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी न्यायाधीश गवारे यांनी नेत्रदानाची प्रतिज्ञा घेतली व संमतीपत्र भरून आपले डोळे दान करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिपचंद सोयाम होते, त्यांनी उपस्थितांना नेत्रदानाच्या महत्त्वावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “नत्रदानामुळे मरणोत्तर आपले डोळे गरजू लोकांना दृष्टी प्रदान करू शकतात. भंडारा वासियांनी या महत्त्वपूर्ण चळवळीत सहभागी होऊन नेत्रदानाचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे.

जिल्ह्यात मार्च 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत मरणोत्तर 56 नेत्रबुबुळे दान करण्यात आली आहेत, ज्यामुळे १५६ टक्के नेत्रदानाचे कार्य यशस्वीपणे पार पडले आहे. एप्रिल 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत 40 टक्के कार्य पूर्ण झाले आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मृत्यूपश्चात नेत्रदान केलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन रेड क्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा भंडारा चेअरमेन डॉ. अशोकराव ब्राम्हणकर उपस्थित होते. त्यांनी नेत्रदानाच्या गरजेवर भर दिला.

कार्यक्रमाचे संचालन सोनाली लांबट यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. प्रिया सयाम यांनी केले. याप्रसंगी नेत्रशल्य चिकित्सक डॉ. दुर्गेश पशिने, नेत्र चिकित्सा अधिकारी संजय शेंडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button