मित्रानेच केली अंध मित्राची ११ लाखांनी फसवणूक

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लुबाडले
नागपूर : सरकारी नोकरीच्या आमिषाला बळी पडलेल्या एका तरुणाला १० लाख ८२ हजार ५०० रुपये गमवावे लागल्याची घटना कपिलनगर ठाण्यांतर्गत घडली. भागवत नामदेव पनपते (३७, रा. धापेवाडा, ता. कळमेश्वर, जि. नागपूर), असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
आशिष अशोक पाचभावे (३१, रा. गायकवाड ले-आउट, नारी, कपिलनगर) याला डोळ्यांनी दिसत नाही. २०१० ते २०१२ यादरम्यान आशिष महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. यावेळी त्याची भागवत पनपते याच्याशी ओळख झाली. एके दिवशी भागवत याने आशिषजवळ सरकारी नोकरीचा विषय काढला. आशिषला तू डोळ्यांनी अपंग असल्याने लगेचच नोकरी मिळेल, असे म्हणत अमरावती येथील सरकारी रुग्णालयात एमपीडब्ल्यू मलेरिया विभागात नोकरी लावून देऊ शकतो, असे सांगितले. आशिषचाही त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला. नोकरीसाठी पैसे लागणार होते. ११ सप्टेंबर २०२२ ते २० जून २०२४ यादरम्यान ही रक्कम आशिषने रोख तसेच काही रक्कम ऑनलाइन, असे एकूण १० लाख ८२ हजार ५०० रुपये भागवत याला दिले. त्यानंतरही आशिषला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे दिलेली रक्कम त्याने परत मागितली असता भागवत देण्यास टाळाटाळ करू लागला. मित्रानेच आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर आशिषने दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.



