भंडारामुख्य बातमीविदर्भ

५ हजाराची लाच घेताना सहायक पोलिस उपनिरीक्षकाला अटक

वाळूचा टिप्पर सोडण्यासाठी मागितली लाच

भंडारा : रस्ता अपघातप्रकरणी जप्त केलेला वाळूचा टिप्पर सोडून देण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या; मात्र नंतर संशय आल्यावर रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ करणाऱ्या वरठी (ता. मोहाडी) येथील सहायक पोलिस उपनिरीक्षकाला गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. राजेश सदाशिव बाभरे (वय ५६), असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अपघाताच्या प्रकरणात वरठी पोलिसांनी रेतीचा टिप्पर ताब्यात घेतला होता. कोणतीही कारवाई न करता ते सोडून देण्यासाठी नागपूर येथील एका ४४ वर्षीय तक्रारदाराकडे बाभरे याने ५ हजार रुपयांची मागणी केली होती. संबंधित तक्रारदाराने ६ सप्टेंबरला एसीबीच्या भंडारा येथील कार्यालयात यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यानंतर सापळा रचण्यात आला. ठरल्यानुसार, बाभरे याने तडजोड करून तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी पंच नेमून सापळाही रचला होता. मात्र, संशय आल्याने बाभरे याने, १३ सप्टेंबर, १४ सप्टेंबर आणि १९ सप्टेंबर या तीनही दिवस पैसे स्वीकारले नाही. अखेर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button