
उमेदवारांनी दस्तावेज पडताळणीसाठी वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे – सीईओ आयुषी सिंह
गडचिरोली : अनुसूचित क्षेत्रातील (PESA) १७ संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या पदभरतीचा निकाल जाहीर झाला असून, पात्र उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पैसा क्षेत्रातील पदे वर्षभरापासून रिक्त असल्याने विशेष बाब म्हणून ही पदे तातडीने भरण्यासाठी जिल्हा परिषदेला शासन निर्णयान्वये परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार संवर्गनिहाय निवड प्रक्रिया राबविण्यात आली. पदभरती संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार, अनुपालन अहवाल ८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत शासनास सादर करावयाचा आहे. त्याकरिता आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), कंत्राटी ग्रामसेवक, पशुधन पर्यवेक्षक व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची गुणवत्तेनुसार दस्ताऐवज पडताळणी तातडीने करण्यात येणार आहे. यातील पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी व दस्ताऐवज पडताळणीचे वेळापत्रक जिल्हा परिषदेच्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट देऊन गुणवत्ता यादी व वेळापत्रकाची पाहणी करुन नियोजित वेळी दस्तऐवज पडताळणीकरिता उपस्थित राहावे. अनुपस्थित राहिल्यास पुनश्च संधी देता येणार नाही, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी आयुषी सिंह यांनी सांगितले.



