पत्नीच्या पोटावर चाकूने वार ; आरोपी पतीला अटक

हळदवाही येथील घटना
घोट : येथून जवळच असलेल्या हळदवाही येथे पतीने आपल्या पत्नीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घडली. आरोपी महेश रूषी नैताम (वय २८) रा. दिभना, ता. गडचिरोली याला घोट पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी पती महेश नैताम हा दारू पिऊन येऊन पत्नीला मारझोड व शिवीगाळ करत असल्याने पत्नी डिम्पल महेश नैताम ही आईवडिलांच्या घरी माहेरी हळदवाही येथे राहत होती. महेशने सासुरवाडी गाठली. तू सासरी का येत नाहीस असे म्हणत चाकूने पत्नीच्या पोटावर, डाव्या हाताच्या कोपऱ्यावर, डाव्या बाजूला कमरेच्या खाली, डाव्या बाजूच्या कुशीत चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले. फिर्यादी पत्नीच्या व मेडिकल रिपोर्टवरून पोलिस मदत केंद्र घोट येथे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी पतीला ३ ऑक्टोबर रोजी अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
गुन्हाचा तपास घोट पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक नितेश गोहणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दिलीप सिडाम करीत आहेत.



