गडचिरोलीविदर्भ

महिलांनी काढली दारूबंदीची मशाल रॅली

दारूविक्रेत्यांना दिली ताकीद 

कुरखेडा : तालुक्यातील चरवीदंड, पालापुंडी येथील शक्तिपथ संघटनेच्या महिलांनी गावात दारूबंदी मशाल रॅलीच्या माध्यमातून दारूविक्रेत्यांच्या घरी भेट देऊन अवैध व्यवसाय बंद करण्याची ताकीद दिली. तसेच सभेच्या निर्णयाचे उल्लंघन करीत दारूविक्री केल्यास ५० हजार रुपये दंड व कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला.

चरवीदंड येथे चरवीदंड, पालापुंडी, येडसकुही या गावातील महिलांची सभा ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तंमुस अध्यक्ष मोतीराम मडावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यामध्ये दारूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी समिती नेमण्यात आली. त्यानंतर अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय घेऊन दारूविक्रेत्यावर ५० हजार रुपये दंड, ग्रामपंचायत द्वारे शासकीय दाखले व कागदपत्रे बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. महिलांच्या निर्णयाचे स्वागत करीत तिन्ही गावातील पोलीस पाटील, तंटामुक्त समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी महिलांना पूर्ण पाठिंबा दिला व स्वतःही दारूमुक्त समितीमध्ये सहभागी झाले. पालापुंडी व चरवीदंड येथे मुक्तीपथ शक्तिपत समिती स्थापन करण्यात आली. त्यामध्ये बहुसंख्य महिलांनी सहभाग दर्शविला.

यावेळी मुक्तिपथ तालुका चमूने समितीचे कार्य व उद्देश पटवून देत आपल्या गावातील अवैध दारूविक्री थांबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना सुचविल्या. दरम्यान, सभेत घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करीत चरवीदंड, पालापुंडी गावातील महिलांनी दारूबंदीची मशाल रॅली काढत दारूविक्रेत्यांच्या घरी भेट दिली. त्यांना समज देत तत्काळ दारूविक्रीचा अवैध व्यवसाय थांबविण्याचे आवाहन केले. तसेच सूचनेचे पालन न करता दारूविक्री केल्यास सभेच्या निर्णयानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे ठणकावून सांगण्यात आले.

सभेमध्ये सरपंच भोपाल कुंबरे, उपसरपंच केशीकला गोर्टेकर, शामराव कुमरे, ग्रामसेविका रसिका सिडाम, पोलीस पाटील नामदेव मडावी, रेवता कुमरे, पोलीस पाटील चेतना गोरठेकर, रमाबाई  कुमरे, कौशल्या बावणे, रुखमाई जाडे, कौशल्या उसेंडी, ग्रापं सदस्य तुलावी, प्रज्ञा सहारे, माधुरी कोकोडे, शालिना कुमरे, उषा कुमरे, नीलम बावणे, शीला कुमरे, जनाबाई उसेंडी, अर्चना कुमरे, पूजा कोकोडे, वनिता परसो, वैशाली कुडमेथे, जिजाबाई कुमरे, मनीषा गावडे, वच्छला मडावी, सुलोचना पुसाम, वंदना कुमरे, अनुसया बावणे, तंटामुक्ती समितीचे सर्व सदस्य, पालापुंडी, चरवीदंड, येडसकुही येथील महिला पदाधिकारी, मुक्तिपथतर्फे तालुका प्रभारी शारदा मेश्राम व तालुका प्रेरक जीवन दहीकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button