क्राईमगडचिरोलीविदर्भ

बनावट देशी दारूच्या कारखान्यावर धाड ; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची मुरुमगावमध्ये धडक कारवाई ; ‘स्पिरीट‘सह सीलिंग मशीन व दोन वाहने हस्तगत

गडचिरोली : जिल्ह्यामध्ये दारुबंदी असतानाही अवैधरित्या छुप्या मार्गाने दारूची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने ०३ नोव्हेंबर रोजी धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथे एका बनावट देशी दारूच्या कारखान्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे १० लाख १६ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदार यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, व्यंकटेश बैरमवार (रा. मुरुमगाव, ता. धानोरा) हा आपल्या घरी बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना चालवत असून, तो तयार केलेली दारू टाटा कंपनीचे सुपर ए.सी.ई. मिंट (क्र. एम. एच. ३४ ए. वी. २०५१) या वाहनातून परिसरामध्ये पुरवत आहे.

माहितीनुसार, पोलीस पथकाने मुरुमगाव बाजार मंडी येथे सापळा रचला असता, संशयित टाटा सुपर ए.सी.ई. मिंट चारचाकी वाहन उभे असल्याचे दिसले. पंचासमक्ष वाहनाची पाहणी केली असता, वाहनाच्या मागील डाल्यात असलेल्या ‘चोरकप्या’मध्ये देशी-विदेशी दारूचा साठा मिळून आला. याच ठिकाणी व्यंकटेश बैरमवार याच्या मालकीचे अशोक लेलँड कंपनीचे (दोस्त) (क्र. एम एच ३३ टी. २०३५) हे दुसरे संशयास्पद वाहन आढळले. या वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये बनावट दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे रासायनिक द्रव्य (स्पिरीट) ने भरलेले दोन ड्रम मिळून आले.

यानंतर पोलिसांनी आरोपी व्यंकटेश बैरमवार याच्या घरी शोध घेतला असता, तेथे बनावट दारू तयार करणे आणि सील करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. तिन्ही ठिकाणांहून पोलिसांनी रासायनिक द्रव्य (स्पिरीट)- ५०० किलो स्पिरीटसह ०२ ड्रम (किंमत १,५२,०००/-), ०२ चारचाकी वाहने (टाटा सुपर ACE + अशोक लेलँड दोस्त) किंमत ७,००,०००/-, ५५० नग गोवा विस्की व ४०० नग रॉकेट देशी दारू (संत्रा) किंमत १,४२,०००/-, ०२ सीलिंग मशीन, झाकणे, पाईप व खरडे किंमत २२,३७५/-, असा एकूण मुद्देमाल १० लाख १६ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी आरोपी व्यंकटेश बैरमवार (रा. मुरुमगाव) याच्याविरुद्ध मुरुमगाव पोलीस स्टेशनमध्ये अप क्र. ००३८/२०२५, कलम १२३, ३१८ (४) भादंवि, सहकलम ६५ (ड), ६५ (ब), ६५ (ई), ६५ (फ), ६५ (ए), ६५ (सी) मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरू असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि. सचिन ठेंग (पोस्टे मुरुमगाव) हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनि. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि. भगतसिंग दुलत, पोना/ धनंजय चौधरी, पोअं/ राजु पंचफुलीवार, मपोशि/ वृषाली चव्हाण यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button