
क्रांतिसूर्य वीर बिरसा मुंडा बलिदान दिनानिमित्त आरोग्य विभाग आणि पोलिसांचे संयुक्त प्रयत्न
गोंदिया : गोंदिया पोलिसांच्या ‘दादालोरा एक खिडकी योजना’ अंतर्गत, पोलीस विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आज क्रांतिसूर्य वीर बिरसा मुंडा बलिदान दिनानिमित्त मोरगाव अर्जुनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १०६ गरजू लोकांनी मोफत तपासणी, औषधोपचार आणि मार्गदर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती गोठणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल गायकवाड यांनी दिली आहे.
मोरगाव अर्जुनी तालुक्यातील घनदाट जंगलव्याप्त गोठणगाव येथील नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र घरतकर व डॉ. स्नेहल गायकवाड तसेच सशस्त्र दूरक्षेत्र पोलीस ठाणे गोठणगावच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक शुभम नवले व गिते यांच्या सामूहिक प्रयत्नांनी गोठणगाव येथे हे आरोग्य शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले.
शिबिरादरम्यान एकूण १०७ लोकांची तपासणी, निदान आणि औषधोपचार करण्यात आले. त्यासोबत आवश्यक रुग्णांची ईसीजी (ECG) तपासणी, असंसर्गजन्य कार्यक्रम अंतर्गत रक्तदाब व मधुमेह तपासणी, सिकलसेल तपासणी तसेच मोफत प्रयोगशाळा रक्त तपासणी करण्यात आली. या तपशीलवार माहितीमुळे गरजू रुग्णांना योग्य निदान व उपचार मिळाले, असे डॉ. स्नेहल गायकवाड यांनी नमूद केले.
या आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगावचे आरोग्य सहायक संतोष पारधी व किशोर कुर्वे, आरोग्य सहायिका लक्ष्मी मुनेश्वर, फार्मासिस्ट मुकुल बडवाईक, आरोग्य सेवक अमोल मालेकर, आरोग्य सेविका प्रमिला रॉय, स्टाफ ब्रदर चिरायू वावरे यांच्यासह फुलचंद चौधरी, आशा सेविका सविता टेंभुर्णे, भाग्यश्री राणे, परिचर कुमुद शहारे व बागडे यांनी आरोग्य सेवा दिली.
तसेच, शिबिरादरम्यान एच.एल.एल. महालॅबचे नेहा कापगते यांनी सिकलसेल व सी.बी.सी., कोलेस्ट्रॉल, एच.डी.एल., एल.डी.एल., लिपिड प्रोफाइल यांसारख्या विविध प्रयोगशाळा रक्त तपासण्या व समुपदेशन केले. अरविंद उके यांनी नोंदणीचे कार्य सांभाळले, तर वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल गायकवाड यांनी असंसर्गजन्य आजारांविषयी मार्गदर्शन व समुपदेशन केले.
सशस्त्र दूरक्षेत्र पोलीस ठाणे गोठणगावच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक शुभम नवले, गिते व यादव, पोलीस हवालदार सतीश भोवते, पोलीस नाईक कमलेश अलविंद वालदे, पोलीस हवालदार थेर, आणि पोलीस शिपाई मेश्राम यांनी आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या संयुक्त प्रयत्नांमुळे दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ घेणे शक्य झाले.



