गडचिरोलीविदर्भ

रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

मौशी येथील घटना ; आ. मसराम यांनी रुग्णालयात घेतली भेट 

कुरखेडा : तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या एका महिला मजूरावर रानडुकराने भीषण हल्ला केल्याची घटना १२ मे रोजी सकाळी मौशी शिवारात घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सध्या संपूर्ण तालुक्यात तेंदूपत्ता हंगाम जोमाने सुरू आहे. त्यामुळे मौशी येथील मजूर दररोजप्रमाणे सकाळी गावानजीकच्या जंगलात पाने गोळा करण्यासाठी गेले होते. पाने वेचत असताना अचानक एका रानडुकराने विद्या ताराचंद चांभारे (वय ३५) यांच्यावर झडप घातली. विद्या यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूला असलेल्या इतर मजुरांनी तातडीने त्यांच्या दिशेने धाव घेतली. मजुरांचा वाढता राबता पाहून रानडुकराने जंगलाच्या दिशेने पळ काढला, ज्यामुळे पुढील अनर्थ टळला.

रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या विद्या चांभारे यांना सहकाऱ्यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच आमदार रामदास मसराम आणि रुग्ण कल्याण समिती सदस्य जयंत पाटील हरडे यांनी जखमी महिलेची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. आमदारांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारात कोणतीही कसर न सोडण्याच्या सूचना दिल्या. वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पीडित महिलेला तात्काळ आर्थिक मदत आणि वैद्यकीय खर्च देण्याचे निर्देश दिले आहेत.

तेंदूपत्ता हंगामाच्या काळात मजूर पहाटेच जंगलात जातात. मात्र, हिंस्त्र वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वनविभागाने या परिसरात गस्त वाढवावी आणि मजुरांना संरक्षण द्यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button