
गडचिरोली : एकीचे बळ आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील गरंजी गावाने संपूर्ण जिल्ह्यासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून गावात दारू आणि तंबाखू बंदीचा निर्णय घेऊन आज २०१० पासून म्हणजे तब्बल १५ वर्षांपासून हे गाव अवैध दारू व तंबाखू विक्रीमुक्त राखण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.
२०१० मध्ये गरंजी गावात जि.प. शिक्षक कारगिरे यांचे पुढाकारातून आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कुत्तरमारे यांचे व्याख्यान झाले होते. या व्याख्यानातून प्रेरणा घेत गावाची प्रगती आणि विकासासाठी दारूविक्री बंद करणे अत्यंत आवश्यक असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यानंतर तात्काळ ग्रामसभेचे आयोजन करून गावात कडक दारू व तंबाखू बंदी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात आणण्यासाठी गावाने कडक नियम व दंडाची तरतूद केली. गावात दारू विक्री केल्यास १०,००० रुपये दंड, दारू पिऊन भांडण केल्यास ५,००० रुपये दंड. या नियमाची कठोर अंमलबजावणी करत सुरुवातीलाच एका दारू विक्रेत्याकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि गावातील दारूविक्रेत्यांनी आपले अवैध धंदे कायमचे बंद केले.
गावातील ही दारू आणि तंबाखू बंदी अविरत व कायम टिकून राहावी, यासाठी मुक्तिपथचे तालुका संघटक रुपेश अंबादे यांच्या उपस्थितीत गावात वेळोवेळी बैठका घेतल्या जातात व नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. हा आदर्श कायम ठेवण्यासाठी पेसा अध्यक्ष लालाजी हिचामी, गाव पाटील बाजीराव हिचामी, गाव भूमिया कोत्तू हिचामी, पेसा उपाध्यक्ष संजय हिचामी, ग्राम कोष समिती अध्यक्ष तुळशीराम नरोटे, तसेच तुकाराम कंगाली, किशोर हिचामी, भाऊजी पोटावी, नानाजी पदा यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ सातत्याने परिश्रम घेत आहेत. गावाने दाखवून दिलेल्या एकीच्या बळामुळे आज गरंजी गावात कोणी दारू विक्री करण्याचा विचारही करू शकत नाही. दारू व तंबाखूमुक्त होऊन हे गाव विकासाकडे वाटचाल करत आहे.



