महाराष्ट्रमुख्य बातमीमुंबईराजकीय

चिखली पॅटर्नमुळे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे तंत्र उघड

राज्यात चिखली पॅटर्न सुरू ; भाजपाचा रडीचा डाव, फडणवीस-शिंदे जबाबदार

महाविकास आघाडीच्या नेत्यांचा महायुतीवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाचा रडीचा डाव सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली-23 या विधानसभा मतदार संघात भाजप विरोधी मतदारांची नावं काढून टाकण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू असून असून निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याकडे अज्ञात व्यक्तींनी २,६०० पेक्षा जास्त फॉर्म सात अर्ज दाखल केले आहेत. निवडणुकीत हेराफेरी करून निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाचा हा रडीचा डाव सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यात चिखली पॅटर्न सुरू असल्याचा जोरदार हल्लाबोल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चिखली-23 या मतदार संघात सुरू असलेले गैरप्रकार समोर आणला. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवर सडकून टिका केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, भाजपा रडीचा डाव करण्याचे पाप करत आहे. मतदार यादी तपासून या षडयंत्रात सहभागी झालेल्यांची नावे तपासली पाहिजेत. महाराष्ट्रात योजना दूत नावाने नेमणूक केल्या आहेत हे सगळे भाजपचे लोक आहेत. त्यामुळे योजना दूतांच्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाला करणार आहे. फॉर्म ७ माध्यमातून नाव वगळण्यात येत आहे. चिखली मतदारसंघात गेल्या दहा दिवसात २६००पेक्षा जास्त फॉर्म ७ दाखल केले आहेत. मतदार यादीतून नाव काढले जात आहे. यामध्ये फडणवीस आणि शिंदे सामील असल्याचा हल्लाबोल पटोले यांनी केला.

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, आम्ही आता निवडणूक आयोगाला भेटणार. लोकसभेत महाविकास आघाडीची अधिकची मतं आहेत. तिथे चिखली पॅटर्न सुरू आहे. जिथे आघाडीला लीड मिळाले तिथे २, ५०० ते दहा हजार मत कशी कमी करता येईल याचे नियोजन फडणवीस आणि शिंदे करत आहेत. फॉर्म ७ स्वीकारले जाऊ नयेत. महाराष्ट्रात महायुती घाबरली आहे. मतदारांचे नाव वेगळे फोटो वेगळे अशी परिस्थिती आहे. मग पारदर्शी निवडणूक कशी होणार असा देखील प्रश्न उपस्थित होतो. फॉर्म ७ घेणे बंद करा. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या नियुक्त्या, जीआर, निविदा रद्द करा. याबाबत निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. मी मुख्य सचिवांना फोन केला होता, पुन्हा त्यांच्याशी बोलणार आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, मागच्या तारखेने सरकारने  आदेश काढले आहेत. दुपारी साडे तीन नंतर जे काही केलं ते रद्द केले पाहिजे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, फॉर्म ७ ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया संशयास्पद आहे. सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली निवडणूक अधिकारी काम करत आहेत. मतदार यादीचे प्रिंटिंग घाणेरडे आहे. नाव वाचता येत नाही. पत्ता चुकीचा. फोटो चुकीचे आहेत. डिजिटल इंडिया म्हणतात आणि मतदार यादी नीट करता येत नाही. एका घरातील पाच माणसे वेगवेगळ्या केंद्रावर मतदान करायला जातात. हे सगळं मतदानाची टक्केवारी कमी करण्यासाठी केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये डीजीना हटवले. महाराष्ट्रातील डीजी बाबत निवडणूक आयोग कारवाई करत नाही. निवडणूक आयोगाने पारदर्शक राहिले तरच निवडणूक पारदर्शी होईल.

पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंत्रालयात मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेऊन निवदेन दिले. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक कामकाजात होत असलेला हस्तक्षेप चोक्कलिंगम यांच्या निदर्शनास आणून दिला. यावेळी काँग्रेसकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार सतेज पाटील, नसीम खान, नाना गावंडे, शिवसेनेकडून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button