गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

एटापल्लीत ‘शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहीम’; एका विद्यार्थ्याला दोन वर्षांनंतर पुन्हा शाळेत केले दाखल

एटापल्ली : “एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये” हे ध्येय घेऊन, पंचायत समिती एटापल्लीच्या प्राथमिक शिक्षण विभागाने १ ते १५ जुलै दरम्यान एक व्यापक ‘शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहीम’ हाती घेतली आहे. या मोहिमेमुळे ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य आणि स्थलांतरित मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रयत्नांना यश येत असून, नुकतेच एका विद्यार्थ्याला दोन वर्षांनंतर पुन्हा शाळेत दाखल करण्यात आले आहे.

या शोधमोहिमेअंतर्गत, शिक्षण विभागाचे कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी आणि शाळेतील शिक्षक गावोगावी फिरून शाळाबाह्य मुलांचा शोध घेत आहेत. बसस्थानके, रेल्वेस्थानके, बाजारपेठा, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, खेडेगावे आणि स्थलांतरित कुटुंबांच्या वस्त्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दुर्गम भागातील वाड्या, वस्त्या, तांडे आणि शेतमळ्यांमध्येही सखोल सर्वेक्षण केले जात आहे. जे विद्यार्थी कधीच शाळेत दाखल झाले नाहीत किंवा सलग ३० दिवसांपेक्षा जास्त काळ गैरहजर आहेत, त्यांना या मोहिमेतून शोधून काढले जात आहे.

या मोहिमेदरम्यान, गट्टा केंद्रातील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय, गट्टा येथील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सर्वेक्षण करत असताना सचिन मैनु मट्टामी नावाचा एक शाळाबाह्य विद्यार्थी सापडला. सचिन दोडुर गावाचा असून, मागील दोन वर्षांपासून तब्येतीच्या कारणामुळे शाळेपासून दूर होता. सर्वेक्षणामध्ये तो शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास येताच, त्याला तात्काळ नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय, गट्टा येथे दाखल करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी तत्परतेने या विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश देऊन त्याचे स्वागत केले आणि त्याला पुन्हा शालेय प्रवाहात आणले.

सचिनला शाळेत आणि वसतिगृहात दाखल करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगे आहेत. त्यांच्या या कामाचे कौतुक करत, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बुरडकर यांनी शिक्षकांचे अभिनंदन केले.

एटापल्ली शिक्षण विभागाच्या या प्रयत्नांमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना पुन्हा शाळेची कवाडे खुली झाली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button