गडचिरोलीविदर्भ

माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांचा शेकडो समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत भव्य सोहळा ; भाजपवर जोरदार टीका

गडचिरोली: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि गडचिरोलीचे अनेक वर्षे नगराध्यक्ष राहिलेले सुरेश पोरेड्डीवार, माजी प्राचार्य कविता पोरेड्डीवार, माजी सभापती विजय गोरडवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षलता येलमुले, अ‍ॅड. लालसू नोगोटी यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका आणि शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. २७) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात हा भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.

यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप आणि त्यांच्या विचारधारेवर जोरदार टीका केली. सपकाळ म्हणाले, “भाजप विचारधारेच्या लोकांनी पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले यांना प्रचंड त्रास दिला. आताही ‘आम्हीच मोठे, बाकी सगळे कनिष्ठ’ हाच भाजपचा विचार आहे.”

काँग्रेसने गोरगरिबांना अन्न, निवारा आणि सुरक्षा दिली, तसेच राज्यघटनेतील पाचव्या अनुसूचीद्वारे आदिवासींच्या जमिनीचे संरक्षण केले. मात्र, आता भाजपने या जमिनी खाण व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर देण्याचा घाट घातला आहे. “देशाच्या पंतप्रधानांना श्रीमंतांविषयी आपुलकी आहे, पण गरिबांविषयी कळवळा नाही,” अशी टीका त्यांनी केली.

हा पक्षप्रवेश गडचिरोलीतील राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. प्रसिद्ध नेत्रतज्ञ हेमंत अप्पलवार, माजी नगरसेविका मीनल चिमूरकर, संध्या उईके, कविता बोबाटे, अस्मिता लाडे, अरविंद वासेकर, विजय कावळे, दिलीप धात्रक, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या मनिषा खेवले, रामचंद्र वाढई यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी विधानसभेचे काँग्रेसचे गटनेते आ. विजय वडेट्टीवार, आ. रामदास मसराम, आ. अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आ. विजय वडेट्टीवार यांनीही भाजप, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर यावेळी जोरदार टीका केली. कार्यक्रमाचे संचालन शहराध्यक्ष सतीश विधाते यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button