गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

नक्षल-पोलीस चकमकीत पाच जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्याचा होता डाव

मृतांमध्ये दोन डीव्हीसीएम दर्जाच्या वरिष्ठ कॅडरसह तीन दलम सदस्यांचा समावेश 

३८ लाखांचे होते बक्षीस ; घटनास्थळावरून ०५ अग्निशस्त्र जप्त  

गडचिरोली : छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलात नक्षलवादी व जवानांत झालेल्या जोरदार चकमकीत पाच नक्षल्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली असून यात ३ महिला व २ पुरुषांचा समावेश आहे. चकमकीत एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळून लावण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ०५ अग्निशस्त्र हस्तगत केले आहे.

कंपनी नं. १० ची सीव्हीसीएम जया उर्फ भुरी पदा (वय ३१) रा. उलिया छत्तीसगड, पुरवठा विभागाचा समिती सदस्य तसेच वरिष्ठ नक्षल कमांडर सावजी उर्फ दसरू तुलावी (वय ६५) गुरेकसा, गडचिरोली, दलम सदस्य देवे उर्फ रिता (वय २५) रा. बस्तर एरिया, छत्तीसगड, बसंत आणि सुखमती रा. बस्तर एरिया, छत्तीसगड अशी मृत नक्षल्यांची नावे आहेत.

छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये २१ ऑक्टोबरला पहाटे चकमक सुरु झाली. नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. यात पाच नक्षल्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही चकमक झाली. यावेळी एक पोलीस जवान कुमोद आत्राम हे जखमी झाले. त्यांना  हेलिकॉप्टरच्या मदतीने तातडीने बाहेर काढून नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहेत.

कंपनी नं. १० ची सीव्हीसीएम जया उर्फ भुरी पदा हिच्यावर एकूण ४९ गुन्हे दाखल होते, त्यामध्ये ३१ चकमक, ०३ जाळपोळ, ०४ खून व ११ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. तिच्यावर महाराष्ट्र शासनाने १६ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. वरिष्ठ नक्षल कमांडर सावजी तुलावीवर एकूण २२६ गुन्हे दाखल होते. यामध्ये ८४ चकमक, ३८ जाळपोळ, ५४ खून व इतर ५० गुन्ह्यांचा समावेश आहे. सावजीवर १६ लाखांचे बक्षीस होते. बसंतवर चकमक, जाळपोळ व इतर प्रकरणात एकूण १० गुन्हे दाखल होते. देवे उर्फ रिता, बसंत व सुखमती यांच्यावर महाराष्ट्र शासनाने प्रत्येकी २ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

सदरचे अभियान अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) सुनिल रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी-६० आणि सिआरपीएफ क्युएटीच्या कमांडोनी यशस्वीपणे पार पाडले.  २०२१ पासून गेल्या तीन वर्षात गडचिरोली पोलीसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ८५ कट्टर नक्षलवाद्यांना कंठस्नान, १०९ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आले आहे व ३७ नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. सलग ७२ तास चाललेल्या या खडतर अभियानादरम्यान सी-६० व क्युएटी जवानांनी दाखविलेल्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button