भंडाराविदर्भ

30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन

भंडारा : बॉम्बे उच्च न्यायालय खंडपीठ, नागपुर येथे भंडारा जिल्ह्यातील प्रलंबित असलेले दिवाणी अपील व तडजोड पात्र फौजदारी अपील प्रकरणे प्रत्यक्ष अथवा आभासी अथवा दोन्ही पध्दतीने उपस्थित राहुन विशेष लोकअदालतीत तडजोडीने मिटविण्याची संधी उच्च न्यायालयाने उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी बॉम्बे उच्च न्यायालय खंडपीठ, नागपुर येथे 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर, 2024 रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

तडजोड पात्र प्रलंबित अपील आपसी सामंजस्यातुन निकाली काढण्यासाठी विशेष लोक अदालत हे प्रभावी माध्यम म्हणून समोर आलेले आहे. याद्वारे दोन्ही पक्षांचा विजय असुन मानसिक समाधानाबरोबरच उभय पक्षांचा वेळ आणि पैसा दोन्हीचीही बचत होणार आहे. खटल्यांमध्ये साक्षीपुरावा, उलटतपासणी, दिर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. विवादाचे निराकरण जलदगतीने होणार असुन लोकन्यायालयाच्या निवाड्याविरुध्द अपील नाही, सोबतच न्यायालयीन शुल्काचा परतावा मिळणार आणि विशेष म्हणजे प्रकरण विशेष लोकअदालतीमध्ये ठेवण्याकरीता कोणतीही शुल्क भरावी लागणार नाही.

लोक अदालतीमध्ये तडजोडीद्वारे निकाली निघालेल्या प्रकरणांमुळे पक्षकार यांच्या सोबतच शासन आणि समाज या दोन्ही घटकांना मोठा लाभ प्राप्त झाला आहे. लोक अदालतीचे हे यश लक्षात घेता आणि लोक अदालतीद्वारे पक्षकारांना जलद गतीने मिळणारा दिलासा लक्षात घेता बॉम्बे उच्च न्यायालय, खंडपीठ नागपुर येथे प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्याकरिता विशेष लोक अदालतीचे आयोजन 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर, 2024 रोजी केलेले आहे.

भंडारा जिल्ह्यातील ज्या पक्षकांरांची तडजोड पात्र दिवाणी व फौजदारी अपील बॉम्बे उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर येथे प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी आपली प्रकरणे आपसी समझोत्यातुन तडजोडीद्वारे निकाली काढण्याकरीता ही एक सुवर्णसंधी उच्च न्यायालयाने उपलब्ध करुन दिली आहे.

संबधीत पक्षकारांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा. तडजोड योग्य प्रकरणांची माहीती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा किंवा आपल्या नजीकच्या तालुका विधी सेवा समिती यांचे कडे द्यावी असे आवाहन भंडारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव बिजु गवारे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button