
अंतरगाव शिवारात आढळला बिबट्याचा मृतदेह
चंद्रपूर : सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र नवरगाव बिटातील अंतरगाव येथे गुरुवारी (दि. २४) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास मादी बिबट मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली.
अंतरगाव येथे वनविभागामार्फत नियमित गस्त सुरू असताना अंतरगाव देलनवाडी रस्त्यालगत असलेल्या नाल्यामध्ये शेतशिवारातील ऋषी सीताराम बोरकर यांच्या शेताजवळ गुरूवारी मादी बिबट मृतावस्थेत आढळला. बिबट्याचे वय ३ ते ४ वर्ष असून दोन तीन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. त्याच ठिकाणी पट्टेदार वाघाचेही पगमार्क आढळल्याने दोघांमध्ये झुंज झाली असल्याचा अंदाज वनाधिकारी वर्तवित आहेत. शिवाय बिबट्याच्या पाठीवर व शरीरावर जखमा आढळल्या असून वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मध्यवर्ती काष्ठ भंडार सिंदेवाही येथे शवविच्छेदन करून बिबट्याला जाळण्यात आले.



