
सिहोरा पोलिसांची कारवाई
भंडारा : मध्य प्रदेशातील गावात अनधिकृत रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहेत. या डम्पिंग यॉर्डमधून रात्री महाराष्ट्राच्या सीमेत रेतीची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बुधवारच्या रात्री सापळा रचून पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान जेसीबी मशीन आणि रेतीची विनापरवाना वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त केले. यात ४५ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ट्रक सोंड्याटोला धरण मार्गावरून रेतीची चोरटी वाहतूक महाराष्ट्रात करीत होते. धरणाचा मार्ग खुला असल्याने रेती माफियांनी धरणाचा उपयोग रेतीच्या चोरट्या वाहतुकीसाठी करण्यास सुरुवात केली आहे. नाकाबंदी दरम्यान मध्य प्रदेशातून धरण मार्गाने रेतीचे ट्रक आणि जेसीबी मशीन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ट्रकमध्ये असलेल्या रेतीची पोलिसांनी चौकशी केली असता रॉयल्टी नसल्याचे दिसून आले.
विनापरवाना रेतीची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ट्रक क्रमांक एम.एच. ४० बी.जी. ३४३४, एम. एच. ३६ एफ. ३९२१ आणि पांढऱ्या रंगाची जेसीबी मशीन जप्त केली आहे. काही मोबाइल जप्त केले असून ४५ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आतिश तुकड्डू पटले (२८) रा. डोंगरला, दिनेश सुदाम मोहनकर (२२) रा. खापा, गौरीशंकर उर्फ गोलू सुधाकर शेंडे (२३) रा खरबी, चंद्रशेखर शंकर कुसराम (२३) रा. सिहोरा, शुभम रामा देव्हारे (२३) रा मोहाडी खापा, राकेश रामकृष्ण राऊत रा. डोंगरला यांचे विरोधात गुन्हा दाखल केला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक नितीन मदनकर, राजू साठवणे, तिलक चौधरी, महेश गिन्हेपुंजे, निबेश मोटघरे यांनी केली.



