
गडचिरोली : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील तसेच राज्यातीलही प्राथमिक आरोग्य केंद्रात आपणास यापुढे कंत्राटी सुरक्षारक्षक दवाखान्याची सुरक्षा सांभाळताना दिसून येणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहे, याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली; मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे याप्रक्रियेला रोख लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५३ पीएचसीला निवडणूक संपल्यावर नवीन वर्षात कंत्राटी सुरक्षारक्षक मिळणार आहे.
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान तीन कंत्राटी सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत. जिल्ह्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता कंत्राटी पद्धतीने बाह्ययंत्रणेद्वारे सुरक्षारक्षक सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. कंत्राटी पद्धतीने बाह्ययंत्रणेद्वारे सुरक्षारक्षक नेमण्याच्या प्रक्रियेमध्ये एकसूत्रता राहावी यासाठी सर्व राज्यामध्ये एकाच स्तरावर निविदाप्रक्रिया होणार आहे. आरोग्य केंद्राच्या परिसरात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण, असभ्य वागणूक तसेच दमदाटी करणे, रुग्णांना शिविगाळ करणे, असे प्रकार घडत असतात. या प्रकारांवर सुरक्षारक्षाकांमुळे आळा बसण्यास मदत होणार आहे.



