
गोंदिया : भारत देशातील लोकशाहीच्या उत्सवात महाराष्ट्र राज्यामध्ये यंदा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा करण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोग यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024, 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्याच्या उज्वल भविष्यासाठी सर्वांना मतदानाचे कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे.
मतदार राजाला लोकशाहीने जो मतदानाचा हक्क दिला आहे तो तुम्ही व्यवस्थितपणे योग्य मतदान करून बजवावे. देशाच्या लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी गोंदिया जिल्हा प्रशासन निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणुका घेण्यासाठी कटिबद्ध आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने मतदान होणार आहे. यासाठी गोंदिया जिल्ह्यात अधिकाधिक मतदान होण्याकरिता SVEEP कार्यक्रमांतर्गत महिला मतदारांचे मतदान वाढविण्याच्या उद्देशाने महिलांनी ‘‘एक घर-एक रांगोळी’’ याप्रमाणे 3 लक्ष घरात रांगोळी काढून दिवाळी सणानिमित्त मतदान जनजागृती करण्याकरीता 1 नोव्हेंबर 2024 रोजी दिवाळीच्या दिवशी माझे मत माझा अधिकार/ मेरा मत मेरा अधिकार/ MY VOTE MY RIGHT असे घोषवाक्य लिहून आपल्या घरासमोरची रांगोळी मतदान जनजागृती संबंधाने मोबाईल क्रमांक 7020163400 यावर रांगोळी पाठवून महा निवडणूक-महारांगोळी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी केले आहे.
सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील जिल्हा SVEEP CELL सह नोडल शिखा पिपलेवार, जिल्हा SVEEP CELL सह नोडल डॉ. महेंद्र गजभिये, केदार गोटेफोडे, सचिन धोपेकर, चंदू दमाहे, चंदू दुर्गे, संजय टेंभरे, विजय लिल्हारे, सुनैना पानतावणे तसेच जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील तालुका नोडल त्यांची टीम, सर्व उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, योजनादूत तसेच सर्वच स्तरातील कर्मचारी पर्यवेक्षक यंत्रणा म्हणून काम करणार आहेत.



