
चंद्रपूर : बल्लारपूर मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचाराची सुरुवात करत असताना मुनगंटीवार यांनी मतदारसंघाच्या यादीतील पहिले मतदार आशा विकास आलोने या वयोवृद्ध मतदाराचे आशीर्वाद घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे.
मतदार यादीतील पहिले बूथ असलेल्या भटाडी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावत रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन मुनगंटीवार यांनी ग्रामस्थांना दिले. भाटाडी, पायली गावांचे पुनर्वसन करण्यासाठी योग्य जागा ठरवत आदर्श गाव उभारणी केली जाईल, असे मुनगंटीवार म्हणाले. या गावात जनसंपर्क कार्यालय निर्माण करून नागरिकांच्या समस्या सोडवू, ‘आवाज दो’ अभियानाद्वारे दहा टेलिफोन नंबरवरून नागरिकांना आपल्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचवता येईल, असे आश्वासन उपस्थित नागरिकांना मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.



