गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

निवडणूक दारूमुक्त करू : २९ पैकी २७ उमेदवारांनी दिले वचन

जिल्ह्याच्या दारुबंदीला समर्थन

गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी आहे. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात विधानसभा निवडणूक होऊ घातली असून २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मते मिळविण्यासाठी दारूचा वापर होऊ नये म्हणून ‘जो पाजेल माझ्या नवऱ्याला दारू त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’ असा निर्धार महिलांनी केला आहे. दारू वाटप करून गावातील वातावरण दूषित  करणाऱ्या तसेच आचारसंहिता भंग करण्याचा प्रयत्न करणार्यांना आम्ही मतदान करणार नाही असा ठराव शेकडो गावातील लोकांनी घेतला आहे. त्यामुळे जनतेला प्रतिसाद देत जिल्हाभरातील एकूण २७ उमेदवारांनी दारू वाटणार नाही, अन पिणारही नाही, असे वचन दिले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू आहे. जनतेला गावात शांतता व सुव्यवस्था हवी आहे, दारू नको म्हणून प्रयत्न केले जात आहेत. गावातील महिला-पुरुषांनी अवैध दारूविक्रेत्यांना धडा शिकवून आपल्या गावाला दारूमुक्त केले आहे. परंतु, निवडणूक काळात मतदान आपल्याकडे वळविण्यासाठी उमेदवारांकडून दारु चे वाटप होण्याची भीती असते, यामुळे मुक्तिपथ टीम व स्वीप मतदाता कार्यक्रम जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून मतदान जागृती व दारूमुक्त निवडणुकीसाठी आवाहन करण्यात आले आहे. शहरामध्ये मोठे बॅनर, वार्डा-वॉर्डात मुख्य ठिकाणी पोस्टर, घरोघरी माहिती पत्रक, वार्ड सभा ऑडिओ क्लिप, शॉर्ट व्हिडीओ आदी विविध पद्धती वापरून जनजागृती करण्यात आली आहे.

निवडणुकीमध्ये उभा राहणारा उमेदवार गाव व जिल्हा दारूबंदीचे समर्थन करणारा असावा. आमचे मत हवे असल्यास दारूबंदी समर्थनाचे लिखित वचन निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवाराने आम्हाला द्यावे. वचन न देणाऱ्या नेत्याला, उमेदवाराला आम्ही मत देणार नाही, जो दारू वाटप करेल त्याला आम्ही मत देणार नाही, असा ठराव आतापर्यंत एकूण ३०९ गावांनी घेतला आहे. जनतेच्या निर्णयाला उत्तम प्रतिसाद देत तिन्ही विधानसभा क्षेत्रातील एकूण २९ उमेदवारांपैकी २७ जणांनी वचननामा दिला आहे. निवडणुकीत मी व माझा पक्ष मते मिळवण्यासाठी दारूचा वापर करणार नाही. मी गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीचे समर्थन करतो. या निवडणुकीत निवडून आल्यास अथवा न आल्यास जिल्ह्यातील दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मी पूर्णपणे प्रयत्न करीन, असे वचननामे उमेदवारांनी लिखित व रेकोर्डेड पद्धतीने दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button