दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस पलटली ; नऊ जण ठार

कोहमारा राज्य महामार्गावरील खजरी गावाजवळील घटना
गोंदिया : गोंदियातील कोहमारा राज्य महामार्गावरील खजरी गावाजवळ दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शिवशाही बस दुचाकीला धडकून उलटली. या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
२९ नोव्हेंबर रोजी दुपारी 12:00 ते 12:30 च्या दरम्यान शिवशाही बस (क्र. एमएच 09-ईएम 1273) नागपूरहून गोंदियाकडे, गोंदिया ते भंडारा जात असताना हा अपघात झाला. कोहमारा राज्य महामार्गावरील खजरी गावाजवळ वळणाच्या रस्त्यावर अचानक एक दुचाकी दिसली. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाने जोरात वळण घेतल्याने बस पलटी झाली. अपघाताच्यावेळी बसमध्ये 35 हून अधिक प्रवासी होते. काही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर काही गंभीर जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अपघात होताच बस चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. नागरिकांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, त्यानंतर रुग्णवाहिका आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. जखमी प्रवाशांना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. क्रेनच्या सहाय्याने उलटलेली बस काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.



