
गडचिरोली : शालेय जीवनात खेळल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धा या केवळ मनोरंजनाचा एक भाग नाहीत, तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. एकंदरीत क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये शारीरिक, मानसिक आणि सामाजिक गुणांचा विकास होतो, ज्यामुळे त्यांचे जीवन अधिक सकारात्मक आणि समृद्ध होते. शिवाय समाजाच्या विविध स्तरांत एकोपा वाढविण्याचा काम सुद्धा होतो म्हणून शालेय जीवनापासूनच खेळ जीवनात आवश्यक आहे, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांनी गोंडवाना सैनिकी विद्यालयातील सैनिकोत्सव मधील क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलताना केले.
स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्याकरिता सैनिकोत्सव चे आयोजन करण्यात येते. यावर्षी सैनिकोत्सव २०२४ चे आयोजन 1 ते 8 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. यातील क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी हे होते तर उद्घाटक म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण हे होते, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी बडकेलवार, तालुका क्रीडा सचिव खुशाल म्हस्के, उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे, सैनिकी निदेशक ऋषी वंजारी हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माण्यवरांच्या हस्ते बलदेवता हनुमान यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. त्यानंतर अतिथींच्या हस्ते क्रीडाज्योत प्रतिष्ठापित करण्यात आली. विद्यालयाच्या चारही हाउस मधील कॅडेट्सनी सिनिअर व जुनिअर गटात क्रीडा पथसंचलन करून सर्वांची मने जिंकली.
प्रसंगी विद्यार्थ्यांच्या उत्तम क्रीडा गुणामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे विद्यालय म्हणून गोंडवाना सैनिकी विद्यालयाकडे बघितल्या जातो असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी बडकेलवार यांनी केले, तर क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणे हे शारीरिक तंदुरुस्तीसाठी अत्यंत फायदेशीर आहे. नियमित व्यायाम, शरीराची चांगली स्थिती राखणे आणि विविध क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेणं, हे सर्व शरीरासाठी आवश्यक आहे. खेळामुळे हृदयाची कार्यक्षमता सुधारते, वजन नियंत्रित राहते, आणि संपूर्ण शरीरातील स्नायू मजबूत होतात. याशिवाय, खेळ खेळताना एकाग्रता आणि स्थिरता देखील येते. क्रीडा स्पर्धा मानसिक ताण कमी करण्याचे प्रभावी साधन ठरू शकतात. शारीरिक क्रियाकलापामुळे मेंदूला आराम मिळतो.
खेळाडूंना परिस्थितीवर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देण्याची क्षमता प्राप्त होते, ज्यामुळे मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. क्रीडा स्पर्धांचे महत्त्व केवळ शारीरिक तंदुरुस्तीपर्यंतच मर्यादित नाही, तर त्या मानसिक, सामाजिक, आणि नैतिक विकासाच्या बाबतीत देखील अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. म्हणून क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणे हे व्यक्तीला अधिक चांगला, समृद्ध आणि आत्मविश्वासी बनवते. त्यामुळे, प्रत्येक व्यक्तीला क्रीडा स्पर्धांमध्ये सक्रियपणे भाग घेणे आवश्यक आहे, कारण त्या आपल्या जीवनाच्या विविध पैलूंना समृद्ध करतात असे मत प्राचार्य संजीव गोसावी यांनी मांडले. खुशाल म्हस्के यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,
संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओमप्रकाश संग्रामे यांनी, संचालन योगेश आसमवार यांनी केले तर आभार गजानन अनमुलवार यांनी मानले. उद्घाटनीय सामना हा सुभाषचंद्र बोस हाउस व वीर सावरकर हाउस दरम्यान खेळला गेल्या.



