गडचिरोलीविदर्भ

मार्कंडा देव येथे दारूबंदीसाठी ग्रामस्थ एकवटले

एका दारू विक्रेत्याला केले पोलिसांच्या स्वाधीन ; अवैध दारूविक्रीविरोधात महिला व युवकांचा अहिंसक लढा

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देव येथे अवैध दारूविक्री समूळ नष्ट करण्यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. मुक्तिपथ संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत समिती, युवक मंडळ आणि महिलांनी एकत्र येत अहिंसक कृती सुरू केली आहे. नुकतेच त्यांनी एका दारू विक्रेत्याला पोलिसांच्या स्वाधीन करून मोठ्या प्रमाणात देशी दारू नष्ट केली.

मार्कंडा देव गावात अवैध दारूविक्री सुरू असल्याने येथील गावातील मद्यपींसोबतच जवळच्या फराडा आणि मोहुर्ली येथील मद्यपीदेखील येथे येतात. त्यामुळे गावात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दारूमुळे काही लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याने ग्रामस्थांनी आपले गाव व्यसनमुक्त करण्याचा निर्धार केला. यासाठी ग्रामपंचायत समिती आणि शक्तिपथ महिला संघटनेची एक संयुक्त बैठक झाली. त्यात मुक्तिपथचे तालुका संघटक आनंद इंगळे यांच्या उपस्थितीत दारू विक्रेत्यांविरोधात अहिंसक कृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयानुसार, महिला आणि युवकांनी दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन त्यांना नोटीस देत तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आवाहन केले. या मोहिमेदरम्यान एका विक्रेत्याकडे मोठी प्रमाणात देशी दारू आढळून आली, ती संपूर्ण नष्ट करण्यात आली. तसेच, त्या विक्रेत्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईनंतरही इतर दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. गावातील तंटामुक्ती अध्यक्ष मुखरु शेंडे, पोलीस पाटील आरती आभारे, गाव संघटन अध्यक्षा सुनीता मरसकोल्हे आणि मुक्तिपथ तालुका संघटक आनंद इंगळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ या मोहिमेत सक्रियपणे सहभागी झाले आहेत. दारू पूर्णपणे बंद होईपर्यंत विक्रेत्यांवर पाळत ठेवण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button