
बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात मोहीम ; १ हजार ५० रुपयांचा दंड वसूल
गोंदिया : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी तंबाखूमुक्त युवा अभियानअंतर्गत शुक्रवारी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात धाडसत्र राबविण्यात आले. यात रुग्णालयाच्या आवारात तंबाखू व गुटखा सेवन करणाऱ्या १३ जणांवर कारवाई करण्यात आली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक शासकीय रुग्णालय यांच्या एकत्रित सहकार्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांच्या मार्गदर्शनात बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात धाड टाकून १३ तंबाखू, गुटखा खाणाऱ्या व बाळगणाऱ्या लोकांवर तंबाखू नियंत्रण कोटपा कायदा २००३ अंतर्गत दंडात्मक कारवाई करून एक हजार पन्नास रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय हे जिल्ह्यातील एकमेव स्त्री रुग्णालय असून या ठिकाणी सर्वांत जास्त प्रसूतीसाठी महिला व त्यांच्यासोबत नातेवाईक जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून रुग्ण दाखल होत असतात. लोकांची खूप वर्दळ सतत तेथे बघावयास मिळते. त्यामुळेच लोकांकडे तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.
धाडसत्र कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पवन राऊत, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. अनिल आटे, जिल्हा सल्लागार डॉ. ज्योती राठोड, डॉ. गुरुप्रकाश खोब्रागडे, मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम, दंत शल्यचिकित्सक डॉ. अमोल राठोड, सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर, दंत सहायक विवेकानंद कोरे व पोलिस शिपाई कविता लिल्हारे यांनी केली.



