सात लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण

लहानपणापासून नक्षलवादी संघटनेशी संबंधित, बिजापूरमधील पामेड दलम ते प्लाटून सदस्य असा केला प्रवास
गोंदिया : जिल्हा पोलीस दलाच्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले असून, 7 लाख रुपयांचे बक्षिस असलेल्या जहाल नक्षलवाद्याने जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
देवा ऊर्फ अर्जुन ऊर्फ राकेश सुमडो मुडाम (वय 27) रा. गुंडम सुटबाईपारा, बिजापूर (छत्तीसगड) असे आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. माओवादी संघटनेतील प्लाटून पार्टी कमिटी सदस्य म्हणून तो कार्यरत होता. त्याच्या विरोधात विविध हिंसाचार, सशस्त्र चकमकी आणि हत्याकांडांच्या घटना नोंदविल्या आहेत.
देवाने 26 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या समोर आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पणाची कारणेः
माओवाद्यांच्या खोट्या धोरणांचा उलगडा: माओवादी चळवळीत खालच्या स्तरातील सदस्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही. फक्त वरिष्ठ सदस्यांना फायदा होतो.
फंडाच्या गैरव्यवहाराचा त्रासः विविध स्त्रोतांकडून गोळा केलेल्या निधीचा वापर फक्त वरिष्ठ कैडर स्वतःसाठी करतात.
जनतेचा पाठींबा कमीः शासनाच्या कल्याणकारी योजनांमुळे स्थानिक जनता माओवादी चळवळीपासून दूर गेली आहे.
कुटुंब आणि सामाजिक जीवनाचा अभावः माओवाद्यांच्या चळवळीत कुटुंबीयांशी संपर्क तुटतो, आणि वैवाहिक आयुष्यही अशक्य होते.
पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी मोहिमेमुळे जंगलातील वावर कठीण झाला आहे. देवाने 2014 मध्ये पामेड दलममध्ये सामील होऊन माओवादी चळवळीत प्रवेश केला. त्याने दक्षिण बस्तर, मलाजखंड दलम, आणि पामेड प्लाटूनमध्ये काम केले. त्याच्या विरोधात टिपागड फायरींग (गडचिरोली), किस्टाराम ब्लास्ट (सुकमा, छ.ग.), झिलमिली फायरींग (राजनांदगाव, छ.ग.) यांसारख्या अनेक गंभीर घटनांतील सहभागाची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नक्षल आत्मसमर्पण योजना अंतर्गत माओवादींना हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी सुवर्णसंधी दिली जाते. गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत 23 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
ही कारवाई नक्षलविरोधी अभियान नागपूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी म्हटले आहे की, “हिंसा सोडून विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याची संधी देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी इच्छुक असलेल्या माओवाद्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गोंदिया पोलीस दल सहकार्य करेल.गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाचे हे यश माओवाद्यांच्या चळवळीवर मोठा आघात ठरणार आहे आणि जिल्ह्यातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.



