
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे समान किमान कार्यक्रम माहे डिसेंबर – २०२४ नुसार व अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांचे आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीतर्फे लोक बिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा, ता. भामरागड येथे ‘बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२’ आणि ‘अंमली व मादक पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्परिणाम’ या विषयावर कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. आर. पाटील, सहा. लोक अभिरक्षक अॅड. स्नेहा ए. मेश्राम, अॅड. कदम, संकेत एस. नानोटी, डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे, समिक्षा आमटे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिक्षा आमटे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आर. आर. पाटील यांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच बालवयात होणारे अत्याचार हे कसे रोखले जाऊ शकतात, चांगला स्पर्श वाईट स्पर्श, वाईट प्रसंगावेळी कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच मादक पदार्थाचे सेवनाचे दुष्परिणामाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमावेळी अॅड स्नेहा ए. मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, बालकांसोबत लैंगिक अत्याचार घडत असतांना याबाबत आपल्या जवळीक शिक्षक, पालक यांना त्याबाबत न घाबरता माहिती दयावी तसेच शिक्षक आणि पालक यांनी याबाबत जागरूक असणे आवश्यक आहे. अॅड. कदम यांनी मुलांशी हितगुज करून विद्यार्थ्यांनी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात व यशस्वी जीवनाकडे वाटचाल करावी असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन एस. के. चुधरी यांनी केले तर आभार लोक बिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा यांचे वतीने मानण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता लोक बिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा येथील सर्व शिक्षक वृंद तसेच कर्मचारी त्याचप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे वरिष्ठ लिपीक एन. आर. भलमे, शिपाई एस. एस. नंदावार यांनी सहकार्य केले.



