
साईटला जिप शाळेतील घटना ; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण
गोंदिया : शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर विद्यार्थ्यांच्या अंगावर कोसळल्याने यात तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.२) दुपारी ०३:०० वाजेच्या सुमारास तालुक्यातील साईटोला येथील जि.प. प्राथमिक शाळेत घडली. जखमी तीन विद्यार्थ्यांपैकी १ विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लखन रंहागडाले (वर्ग तिसरा), असे दुखापत झालेल्या व मयंक दीपराज सोनवाने, क्रिश संजय बिसेन (वर्ग पहिला), अशी किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील साईटोला येथे जि.प. प्राथमिक शाळा असून, पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. चारही वर्गाच्या विद्यार्थ्यांना एकाच खोलीत बसवून धडे दिले जातात. गुरुवारी दुपारी ०३:०० वाजेच्या सुमारास तिसऱ्या वर्गाचे सहा विद्यार्थी गणवेश पाहण्यासाठी आले असता अचानक त्यांच्या अंगावर स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने एक विद्यार्थी गंभीर, तर दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. जखमी विद्यार्थ्याला लगेच प्राथमिक आरोग्य केंद्र, कुन्हाडी येथे औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत २० वर्षांपूर्वी साईटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्गखोलीचे बांधकाम करण्यात आले होते. आता ही इमारत जीर्ण झाली आहे, याची अनेकदा शिक्षण विभागाला माहिती देण्यात आली होती; पण शिक्षण विभागाने याची अद्यापही दखल घेतली नाही. परिणामी, विद्यार्थ्यांना जीर्ण झालेल्या वर्गखोलीत बसून धडे गिरवावे लागत आहेत. यातच गुरुवारी घडलेल्या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पालक व गावकऱ्यांनी या प्रकारावर तीव्र रोष व्यक्त केला आहे.
साईटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळून तीन विद्यार्थी जखमी झाले. या घटनेमुळे पालकांमध्ये रोष व्याप्त असून, शुक्रवारी (दि.३) शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे, तसेच जोपर्यंत शिक्षण विभाग याची दखल घेऊन उपाययोजना करीत नाही, तोपर्यंत शाळा उघडू देणार नाही, अशी भूमिका हिरापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय बिसेन, पोलिस पाटील मिताराम नागोसे, धनेश रहांगडाले, संतोष बिसेन, नरेश रहांगडाले, गोविंद पुसाम, फिरोज पठाण गावकऱ्यांनी घेतली आहे.
जिल्ह्यात जि.प.च्या एकूण १,०६९ शाळा आहेत. यापैकी १७९ शाळांमधील वर्गखोल्या जीर्ण झाल्या आहेत. या जीर्ण वर्गखोल्यांमध्ये बसून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी अनेकदा शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला; पण याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी नसल्याचे कारण जि.प.च्या शिक्षण विभागाकडून पुढे केले जाते.



