
देसाईगंज पोलिसांनी वाचवले प्राण
देसाईगंज : येथील वैनगंगा नदीच्या पुलावरून चक्क नदीत उडी मारलेल्या महिलेचे प्राण वाचवून देसाईगंज पोलिसांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
नवीन वर्षांची सुरुवात होताना देसाईगंज शहरात व परिसरात अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप आगरकर हे आपल्या कर्मचाऱ्यांसह विर्शी टी-पॉइंट परिसरात पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, बुधवारी सायंकाळी 7 वाजता त्यांना नदीच्या पुलावरून एक महिलेने उडी घेतल्याची माहिती मोबाइलवरुन मिळाली. पोलिस निरीक्षक आगरकर क्षणाचाही विलंब न करता ताफ्यासह नदीपात्राजवळ पोहोचले. यावेळी नदीच्या पाण्यात एक महिला वाचवा… वाचवा… अशी ओरडत असताना आगरकर हे स्वतः पाण्यात उतरले. त्यांनी महिलेला पाण्याबाहेर काढून पोलिस वाहनाद्वारे तातडीने ग्रामीण रुग्णालयात भरती केले. डॉ. ईकबाल बेग यांनी महिलेवर उपचार सुरू केले. महिलेचे नाव नेहा कुलदीप मेश्राम (वय 28) असून ती देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील रहिवासी असल्याची ओळख पटली. पोलिसांनी तिच्या पतीला घटनेची माहिती देऊन रुग्णालयात बोलावून घेतले.
महिलेच्या कंबरेला व पायाला इजा झाल्याने पुढिल उपचारासाठी तिला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. नदिपात्रात उडी घेतलेल्या नेहाला पाण्याबाहेर काढताना प्रभारी सहाय्यक पोलिस निरिक्षक संदिप आगरकर यांच्यासह पोलिस हवालदार, जिवन हेडाऊ, दिनेश राऊत, विलास बालमवार, मोरेश्वर चन्ने, जस्पाल चावला पंकज मेश्राम यांनी मदत केली. आगरकर यांनी घडविलेल्या माणुसकीच्या दर्शनाची नागरिकांकडुन प्रशंसा केली जात आहे. सदर प्रकरणाचा तपास कुरखेडाचे उपविभागिय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले तथा देसाईगंजचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक संदिप आगरकर करित आहेत.



