१० लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली : शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 693 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. 08 जानेवारी रोजी दोन जहाल महिला माओवादी कंपनी क्र. 10 पीपीसिएम/सेक्शन कमांडर शामला झुरु पुडो ऊर्फ लीला (वय 36), रा. गट्टेपल्ली, ता. एटापल्ली व भामरागड दलम सदस्य काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी (वय 24) रा. नेलगुंडा, ता. भामरागड यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले.
शामला पुडो ही 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या माओवादी चकमकीत मारल्या गेलेल्या डिकेएसझेडसीएम रुपेश मडावी ऊर्फ सांबा याची पत्नी आहे. 2002 मध्ये चामोर्शी दलम मध्ये सदस्य पदावर भरती होवून काम केले. 2002 मध्ये प्लाटुन क्र. 03 मध्ये बदली होऊन सन 2007 पर्यंत काम केले. 2007 मध्ये कंपनी क्र. 04 मध्ये बदली होऊन सन 2008 पर्यंत काम केले. 2008 मध्ये पीपीसीएम पदावर पदोन्नती होऊन सेक्शन कमांडर म्हणून कंपनी क्र. 04 मध्ये सन 2010 पर्यंत काम केले. 2010 मध्ये कंपनी क्र. 10 मध्ये बदली होऊन सेक्शन कमांडर या पदावर राहुन आजपावेतो काम केले. तिच्यावर आजपर्यंत एकुण 45 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 21 चकमक, 06 जाळपोळ व 18 इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.
काजल वड्डे जानेवारी 2018 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपावेतो कार्यरत होती. तिच्यावर आजपर्यंत एकुण 08 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 04 चकमक, 01 जाळपोळ व 03 इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाने शामला पुडो हिचेवर 08 लाख तर काजल वड्डे 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन शामला पुडो लीला हिला एकुण 5.5 लाख रुपये तर काजल वड्डे हिला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी 2022 ते आतापर्यंत एकुण 46 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. 2025 च्या पहिल्याच आठवड्यात 13 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले, ज्यामध्ये 01 जानेवारी रोजी मुख्यमंंत्री यांचेसमोर 11 वरिष्ठ कॅडरच्या माओवाद्यांचाही समावेश होता.
सदर कारवाई पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल व सिआरपीएफ 113 बटा. कमांण्डट जसवीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.
विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.



