
झंजेरिया गावाजवळील जंगलातील घटना ; तुमसर पोलिसांनी लावला छडा
तुमसर : तालुक्यातील येरली-पचारा क्षेत्रात मोडणाऱ्या झंजेरिया राखीव जंगलातील वाघिणीचे शिकार करून, तिच्या शरीराचे चार भागात तुकडे करून फेकण्याची घटना सोमवारी (दि. 6) उघडकीस आली होती. या घटनेतील आरोपींचा तुमसर पोलिसांनी काही तासातच छडा लावून वन विभागाला सुपूर्त केले.
शीर धडापासून वेगळे, तर शरीराचे तीन तुकडे करून आरोपींनी झंजेरिया बीटच्या तीन तलाव परिसरातील पडारी झुडुपात वाघिणीला फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी (दि. 6) घटना उघडकीस येताच, पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांच्या विशेष सूचनेवरून तुमसर पोलिसांनी वन विभागासोबत समांतर तपास राबवून घटनेच्या अवघ्या काही तासातच वाघिणीचे शिकार करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. राजू पिरतराम वरकडे (वय 50, रा. पाचरा), दुर्गेश तुलसीदास लसुंते (वय 50) व राजेन्द्र ऊर्फ बस्तीराम महादेव कुंजाम (वय 55) दोघेही (रा. नवेगाव) यांना सोमवारी रात्री अटक केली आहे. आरोपी राजू वरखडे याच्या शेतात विद्युत सापळा रचून साथीदारांनी वाघाची शिकार केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तथा वन विभागाने दिली आहे. पोलिसांनी अटकेची कारवाई करून आरोपींना वनविभागाला सुपूर्त केले. त्यामुळे शिकारीच्या घटनेवर पूर्ण विराम लागल्याने सर्वत्र तुमसर पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
घटनेचा मुख्य सूत्रधार राजू वरखडे याची झंजेरिया बीटला लागून वडिलोपार्जित शेती आहे. त्यात पचारा भागात रानटी प्राण्यांच्या शिकारीकरिता राजू ओळखला जातो. पोलिसांनी तपास करून राजूला ताब्यात घेतले. कसून विचारपूस केली असता, राजूने आपल्या साथीदारांच्या मदतीने वाघिणीचे शिकार केल्याची कुबुली दिली. शुक्रवारी रात्री रानटी डुकराच्या शिकारीसाठी राजूने शेतात विद्युत सापळा मांडला होता. त्यात वाघीण अडकली. आरोपीने राजेंद्र व दुर्गेशच्या मदतीने वयस्क वाघिणीच्या शरीराचे तुकडे करून विल्लेवाट लावल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
वन विभागाने घटनेतील तिन्ही आरोपींची वैद्यकीय चाचणी करून मंगळवारी (दि. 7) तुमसर न्यायालयात हजर केले. त्यात आरोपींची शिकारी वृत्ती, हस्तगत केलेली हत्यारे, विद्युत साहित्य व घटनेची संवेदनशीलता ध्यानात घेता न्यायालयाने आरोपीविरुद्ध शनिवार (दि. 11) पर्यंत 5 दिवसांची वन कोठडी ठोठावली आहे.
सोमवारच्या रात्री पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार जयसिंह लिल्हारे, दिगंबर पिपरेवरी यांनी वन विभागाचे डिएफओ राहुल गवई, परिक्षेत्र अधिकारी रहागंडले यांच्या सोबतीने मुख्य आरोपी राजू याच्या घरून जनावरे कापण्याची अवजारे तथा वाघीण कापल्याचे बत्ते जप्त केले आहे. वन तथा पोलिस विभागाची संयुक्त कारवाई पार पडलेली तुमसर तालुक्यात ही पहिलीच घटना ठरली आहे.



