
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठामध्ये वाचन संवाद कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सुप्रसिध्द कथाकार प्रमोद बोरसरे, सुप्रसिध्द कवी पुनीत मातकर व साहित्यिक उपेंद्र रोहणकर यांच्याशी संवाद साधला. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सूचनेनुसार विद्यार्थी, विद्यार्थीनींची वाचन संस्कृती वाढविण्याकरिता गोंडवाना विद्यापीठामध्ये “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून सदर उपक्रमांतर्गत 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत वाचन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत वाचन संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमोद बोरसरे पुस्तक परीक्षण या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, कोणत्याही पुस्तकांचे परीक्षण करताना अभ्यासू वृत्तीने वाचन करणे आवश्यक आहे. पुस्तकामधील आशय, विषय काळजीपूर्वक समजून घेतला पाहिजे. पुनीत मातकर यांनी वाचन कशासाठी या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पुस्ताकांसोबतच आपल्याला मानवी स्वभावाचे देखील वाचन करता आले पाहिजे. पुस्तकांसोबतच माणसेदेखील समजून घेता आली पाहिजेत. उपेंद्र रोहणकर यांनी चोखंदळ वाचक कसा असावा या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांनी साहित्यिकांशी विविध विषयांवर चर्चा करून मनमोकळेपणाने संवाद साधला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे होते. प्रास्ताविक वाचन संकल्प महाराष्ट्राचा संयोजन समितीच्या समन्वयक डॉ. रजनी वाढई यांनी केले. सुत्रसंचालन देवयानी नवघरे या विद्यार्थीनीने केले तर आभार तृप्ती भैसारे या विद्यार्थीनीने मानले. सदर कार्यक्रमाचे नियोजन सहा. प्रा. डॉ. सविता गोविंदवार व सहा. प्रा.डॉ. शिल्पा आठवले यांनी केले.



