पोलीस मुख्यालयाच्या आवारात पोलिसाने संपवले जीवन

बीड येथील घटना ; मुख्यालयाच्या आवारात घेतला गळफास
बीड : जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या आवारातील एका झाडाला गळफास घेऊन पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. अनंत मारोती इंगळे (वय ३५, रा. कळमआंबा, ता. केज, जि. बीड) असे त्यांचे नाव आहे.
जिल्हा पोलिस दलात कार्यरत अनंत इंगळे सध्या पोलिस मुख्यालयात कर्तव्यावर होते. पोलिस वसाहतीत वास्तव्यास असलेल्या अनंत इंगळे यांचा मृतदेह बुधवारी सकाळी मुख्यालयाच्या आवारातील एका आवळ्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोचले. शिवाजीनगर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून इंगळे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. इंगळे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा सध्या चर्चेत आहे. या हत्याप्रकरणाच्या तपासासाठी सध्या सीआयडी आणि विशेष तपास पथकाचे अधिकारी बीड शहरात तळ ठोकून आहेत. बीड शहर पोलीस ठाणे हे सध्या संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे केंद्रस्थान आहे. याच पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी अनंत इंगळे यांनी आत्महत्या केल्याने चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणात आता पोलीस पुढे काय तपास करणार?. अनंत इंगळे यांच्यावर नेमका कोणता दबाव होता की त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे आता पोलीस तपासातून काय समोर येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



