
तीन आरोपींना अटक ; शहर पोलिसांची कारवाई
गडचिरोली : शहर पोलिसांनी मोठी कारवाई करीत गोवंश तस्करीचा डाव उधळून लावला आहे. जिल्हास्थळ असलेल्या गडचिरोली शहरातून चंद्रपूर मार्गे जात असताना 20 गायींना जीवदान देत दोन पीकअप वाहनांसह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शहर पोलिसांनी गुरुवारी, (दि. 16) मुरखळा-मुडझा मार्गावर पार पाडली.
गोवंश तस्करीप्रकरणी किरण सुनीलराव तायवाडे (31, रा. पवनगाव, जि. वर्धा), आफताब वहीद शेख (23) व शाहीद अब्दूल अनीस शेख (19) दोघेही रा. गडचांदूर जि. चंद्रपूर या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ठाणेदार सिंगनजुडे हे शहर पोलिस पथकासह रात्रीच्या सुमारास गस्तीवर होते. अशातच मुडझा- मुरखळा मार्गे दोन वाहनांच्या मदतीने गोवंश तस्करी होत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सापळा रचित दोन पीक वाहनांची तपासणी केली असताना दोन्ही वाहनात एकूण 20 जनावरे कोंबलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी तत्काळ तिन्ही आरोपींना तत्काळ अटक करीत गोवंश तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल केला. सदर कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक एम रमेश, उपविभागीय अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे धनंजय चौधरी, स्वप्नील कुडावले, अविनाश लंजे, स्वदीप मेश्राम, तुषार खोब्रागडे, अतुल भैसारे, राजेंद्र पुरी, वृषाली चव्हाण आदींनी पार पाडली.
कारवाईदरम्यान शहर पोलिसांनी दोन्ही पीकअप वाहनात कोंबलेल्या अवस्थेत असलेल्या 20 जनावरांची सुटका करीत जीवदान दिले. यात जनावरांची किमत 2 लाख रुपये, एमएच 40/ एके-6779 व एमएच 34/ बीझेड-7194 क्रमांकाचे वाहन असा एकूण 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे सदर जनावरे चंद्रपूर जिल्ह्यात कत्तलीसाठी जात असल्याची माहिती आहे.



