
शहरातील रामनगर भागातील घटना
गडचिरोली : माझ्याशी बोलली नाहीस, तर बघ तुझे काय हाल करतो, तुला चपलेले मारहाण करीन, मारून टाकीन, असे मेसेज धाडून धमकी देणाऱ्या तरुणाने युवतीला मैदानावर गाठून मोबाइल हिसकावून नेला. मोबाइल आणण्यासाठी ती त्याच्या खोलीवर गेली असता, त्याने तिला बेदम मारहाण केली. शहरातील रामनगर भागात ही घटना घडली. याप्रकरणी फेब्रुवारीला गडचिरोली ठाण्यात विनयभंग व मारहाण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.
पीडितेच्या फिर्यादीनुसार, तिची या तरुणाशी चार वर्षापासून ओळख असून, दोन वर्षापासून प्रेमसंबंध आहेत. मात्र, अनेकदा तरुण तिच्याशी वाद घालायचा. १ फेब्रुवारी रोजी युवतीने त्याचा क्रमाक ब्लॉक केला, त्यानंतर त्याने वारंवार कॉल करण्याचा प्रयत्न केला. शिवाय टेक्स्ट मेसेज पाठवून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ४ फेब्रुवारी रोजी युवती नित्याप्रमाणे सकाळी सहा वाजता जिल्हा क्रीडा संकुलावर सरावासाठी गेली असता, तेथे येऊन त्याने तिचा मोबाइल हिसकावून नेला. मोबाइल आणून न दिल्याने दुपारी १ वाजता युवती त्याच्या खोलीवर गेली असता, त्याने तिला बेदम मारहाण केली, शर्ट फाडून विनयभंग देखील केला. ५ फेब्रुवारी रोजी पीडितेने याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. उपनिरीक्षक माधुरी मिसाळ तपास करीत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय युवती व आरोपी ३३ वर्षीय तरुण हे दोघेही कोरची तालुक्यातील असून, नातेवाईक आहेत. युवती शहरातील लांझेडा रोडवरील आदिवासी वसतिगृहात राहून एका खासगी महाविद्यालयात बीए द्वितीय वर्षात शिक्षण घेते व पोलिस भरतीचीही तयारी करते, तर आरोपी देखील पोलिस भरतीची तयारी करतो.



