महाराष्ट्रमुख्य बातमीमुंबई

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा, सज्जतेचा आढावा ; मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश

मॉकड्रिल, ब्लॅकआऊट आणि सायबर सुरक्षेवर भर ; जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापन करण्याचे आदेश

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.९) राज्यातील पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून एकूण सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मॉकड्रिल, ब्लॅकआऊट आणि इतर सुरक्षा उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला आणि खालीलप्रमाणे महत्त्वाचे निर्देश दिले:

जिल्हा स्तरावर सज्जता : प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल आयोजित करावे आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापन करावी. जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा, ज्यामुळे आवश्यक साहित्य खरेदी करता येईल.

ब्लॅकआऊट योजना : ब्लॅकआऊटच्या वेळी रुग्णालयांशी समन्वय साधण्यासाठी यंत्रणा तयार करावी. पर्यायी विद्युत व्यवस्था आणि गडद रंगाचे पडदे किंवा काचा वापरून बाहेरील प्रकाश रोखावा. ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि त्या वेळी काय करावे, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी व्हिडिओ प्रसारित करावेत. एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिकांना ब्लॅकआऊट बाबत सूचना द्याव्यात.

सायबर सुरक्षा : पोलिसांच्या सायबर सेलने समाज माध्यमांवर लक्ष ठेवावे आणि पाकिस्तानला मदत करणाऱ्या हॅण्डलवर कारवाई करावी. शासनाच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे सायबर ऑडिट करावे.

सुरक्षा यंत्रणा : पोलिसांनी देशद्रोही कारवाया रोखण्यासाठी अधिक कोंबिंग ऑपरेशन आणि गस्त वाढवावी. सैन्याच्या हालचालींचे चित्रीकरण आणि समाज माध्यमांवर प्रसारण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यकतेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घ्यावीत.

जनजागृती आणि समन्वय : नागरिकांना खरी आणि अद्ययावत माहिती देण्यासाठी शासनाने व्यवस्था करावी. सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यांच्यात अधिक समन्वयासाठी पुढील बैठकीत सैन्य आणि कोस्टगार्डच्या प्रमुखांना निमंत्रित करावे. केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक’ चे सखोल अध्ययन करीत सर्वांना त्याची माहिती द्यावी.

या बैठकीला प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नागरी सुरक्षा अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रभातकुमार, गृहविभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक शिरीष जैन, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button