
सायगावजवळ सुरक्षा भिंत कोसळली; पाणी मिळण्यापूर्वीच शेतकऱ्यांची चिंता वाढली
भंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान मानल्या जाणाऱ्या गोसेखुर्द धरणाचे पाणी मिळण्याचे स्वप्न अद्यापही दिवास्वप्नच ठरत आहे. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत नेरला उपसा सिंचन योजनेतील रेंगोळा ते ढीवरखेडा या ८४०० मीटर लांबीच्या ‘पालांदूर शाखा कालव्याचे’ काम गेल्या १५ वर्षांपासून सुरू होते. मात्र, बुधवारी या कालव्यात पहिल्यांदाच पाणी सोडण्यात आले असता, सायगावजवळ सुरक्षा भिंत कोसळल्याने कालवा दोन्ही बाजूंनी फुटला. पहिल्याच प्रयत्नात कालवा फुटल्यामुळे या प्रकल्पाच्या बांधकामाच्या दर्जावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तज्ज्ञांच्या मते, कालव्यात पाणी सोडण्यापूर्वी त्याची योग्य स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक होते. मात्र, स्वच्छता न केल्याने पाण्याचा प्रवाह खंडित झाला आणि त्यामागे पाण्याचा प्रचंड दाब (Pressure) तयार झाला. या दाबामुळे कच्च्या व निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा टिकाव लागला नाही आणि सायगावजवळ सुरक्षा भिंत कोसळून कालवा फुटला. जर पाण्याच्या उताराच्या दिशेने सूक्ष्म नियोजन (Micro-planning) केले गेले असते, तर हे पाणी ढीवरखेडा टेल (शेवटच्या टोकापर्यंत) सहज पोहोचले असते. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे १५ वर्षांची मेहनत एका झटक्यात वाहून गेली.
सध्या जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी पिका वाचवण्यासाठी चिंतेत आहे. अशा संकटकालीन परिस्थितीत शेतकऱ्यांना गोसेखुर्दच्या पाण्याची अत्यंत निकड होती. मात्र, पाणी शेतात पोहोचण्यापूर्वीच कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. आधीच संकटात असलेला बळीराजा आता पाण्याच्या प्रतीक्षेत अधिकच हतबल झाला असून, या निकृष्ट बांधकामाला जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.



