
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
भंडारा : तालुक्यातील आमगाव दिघोरी येथील एका खून प्रकरणी ७ फेब्रुवारी रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. अस्मार यांनी दोषसिद्धीअंती तिघांना आजीवन कारावास व प्रत्येकी २० हजाराच्या आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली. तर पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
आजीवन कारावासाची शिक्षा झालेल्यांमध्ये सचिन मनोहर उके (२९), रोहन उर्फ गौरव नरेंद्र उके (२४), मयुर प्रभाकर नंदागवळी (२९, तिन्ही रा. आमगाव दिघोरी) यांचा समावेश आहे. आमगाव दिघोरी येथील मृतक सम्मेश मेश्राम हा १७ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास कवलेवाडा रोडने जात असतांना आरोपी सचिन उके, त्याचे भाऊ व ईतर साथीदारांनी जुन्या भांडणाचा मनात राग धरुन धारदार लोखंडी खाचे असलेला सुरा, गुप्ती, कटर व लोखंडी नळाच्या पाईपचे सहाय्याने वार करुन जिवानिशी ठार केले होते. सर्व आरोपी फरार झाल्याने सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक ऋषीकेश चाबुकस्वार यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेत ताब्यात घेतले होते.
सदर प्रकरणात सहायक जिल्हा सरकारी अभियोक्ता दुर्गा तलमले यांनी सरकार पक्षाकडून योग्य बाजू मांडली. पोलिस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कुलकर्णी, कारधा ठाणेदार गणेश पिसाळ यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार सुकरु वल्के यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून कामकाज केले.



