क्रीडागडचिरोलीविदर्भ

राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन व टेनिक्वाईट स्पर्धेचा समारोप

विजेत्यांना बक्षीस वितरण

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ४ ते ६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन (१९ वर्षाखालील) आणि टेनिक्वाईट (१४, १७, १९ वर्षाखालील) क्रीडा स्पर्धा शासकीय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचा समारोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा ६ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.

कार्यक्रमाला शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत जाखी, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटू राजेंद्र भांडारकर, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, ऋषिकांत पापडकर आदी मान्यवर उपस्थित होते. विजेत्या संघांना त्यांच्या उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.

स्पर्धेमध्ये राज्यभरातील नामांकित शाळांनी सहभाग घेतला. बॉल बॅडमिंटन १९ वर्षांखालील मुलांच्या गटात नाशिक विभागातील कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, देवळा या संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर नागपूर विभागातील आर. के. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पुलगाव उपविजेता ठरला. पुणे विभागातील आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, येड्राव, सोलापूर यांनी तृतीय स्थान मिळवले.

मुलींच्या १९ वर्षांखालील गटात पुणे विभागातील महिला आश्रम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कर्वेनगर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. छत्रपती संभाजीनगर विभागातील बहीरजी स्मारक महाविद्यालय, बसमत यांनी दुसरा तर नागपूर विभागातील नूतन कन्या शाळा, भंडारा यांनी तिसरा क्रमांक पटकावला.

टेनिक्वाईट स्पर्धेत विविध वयोगटांमध्ये उत्कृष्ट खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. १४ वर्षे मुलांच्या गटात अमरावती विभागातील जे.डी. चवरे विद्यालय, कारंजा लाड यांनी प्रथम स्थान मिळवले, तर मुलींच्या गटातही याच संस्थेने वर्चस्व गाजवले. १७ वर्षे मुले गटात नागपूर विभागातील बन्सीलाल लाहोटी नुतन महाराष्ट्र विद्यालय, भंडारा विजयी ठरले, तर १७ वर्षे मुलींच्या गटात अमरावती विभागातील कंकुबाई माध्यमिक कन्या शाळा, कारंजा लाड यांनी पहिला क्रमांक मिळवला.

संपूर्ण स्पर्धेचे नियोजन व आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांनी केले होते. कार्यक्रमाचे संचालन क्रीडा मार्गदर्शक नाजूक उईके यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button