
जिल्ह्यातील विशेष दत्तक संस्थेतिल पहिल्या दत्तक बालकाचे हस्तांतरण
गडचिरोली : खरपुंडी गावाजवळच्या रस्त्यावर अतिशय दयनीय अवस्थेत एक बालक मागील वर्षी आढळले होते. बाल कल्याण समितीच्या आदेशाने त्याची काळजी व संरक्षण करण्याची जबाबदारी विशेष दत्तक संस्थेकडे सोपविली होती. सदर संस्थेने चांगल्या पद्धतीने बालकाचे संगोपन केले. त्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी बालकाचे हस्तांतरण इंदूर येथील पालकांकडे करण्यात आले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या हस्ते दत्तक पालकांना बालकाचे हस्तांतरण केले. बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, पुरुषोत्तम चौधरी, महेश हजारे, अधीक्षक नशीब जांभूळकर, डिंपल सहारे व काळजीवाहू कर्मचारी उपस्थित होते.
गडचिरोली येथील विशेष दत्तक संस्थेतील पहिले दत्तक बालक विहान यास दत्तक देण्यात आले. शासनाच्या कारा नियमावलीच्या दत्तक विधान प्रक्रियेचे पालन करून १२ फेब्रुवारी रोजी दत्तकपूर्व परिपोषणासाठी इंदूर येथील पालकांच्या ताब्यात देण्यात आले.



