
गडचिरोली : गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने आता सक्त पाऊल उचलले आहे. मुख्य मार्गावर चेकपोस्ट निर्माण केले जाणार आहेत. या ठिकाणी रात्रंदिवस महसूल व पोलिस कर्मचारी तैनात राहणार आहेत. याबाबतचे पत्र कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी रणजित यादव यांनी निर्गमित केले आहे.
आंधळी, चिखली, चिचटोला, वाकडी, कुरखेडा, कुंभीटोला मार्गे होणाऱ्या गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीला नियंत्रित करण्यासाठी नान्ही-कुंभीटोला फाटा, चिखली-आंधळी फाटा, कुरखेडा-वाकडी फाटा येथे तीन चेकपोस्ट बसविले आहे. या ठिकाणी रात्रंदिवस महसूल विभाग व पोलिस विभागाचे कर्मचारी तैनात राहणार आहेत. सात दिवसांसाठी तीन पथक तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी प्रत्येकी आठ तास याप्रमाणे दिवसातून तीन पथकांचे कर्मचारी तैनात राहणार आहेत. पथकांची नेमणूक केल्यामुळे गौण खनिज चोरीला आळा बसेल, अशी अपेक्षा महसूल विभागाला आहे. पथकांची तस्करांनी धास्ती घेतली आहे. पोलिस पाटलांनाही चेकपोस्टवर नियुक्तीचे निर्देश देण्यात आले आहेत.



