
रेल्वे सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेने वाचले महिलेचे प्राण
गोंदिया : धावत्या रेल्वे गाडीत चढताना एका महिला प्रवाशाचा तोल गेल्याने ती फलाटाच्या गॅपमध्ये पडली. ही बाब रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेत या महिलेला सुखरूपपणे बाहेर काढून तिचे प्राण वाचविले. ही रविवारी (दि.२३) सकाळी १०:३० वाजता गोंदिया रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक चारवर घडली.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी सकाळी १०:३० वाजता गोंदिया रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक चारवर गोंडवाना एक्स्प्रेस आली. ही गाडी या रेल्वे स्थानकावरून १०:३८ सुटली. रेल्वे स्थानकावरून गाडी सुटत असताना ती पकडण्यासाठी एका महिला प्रवाशाने गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. गाडीत चढत असताना महिला प्रवाशाचा तोल गेल्याने त्या फलाटाच्या गॅपमध्ये पडल्या. ही बाब या फलाटावर तैनात असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे जवान के. ए. अन्सारी यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच धावून जात या महिला प्रवाशाला सुखरूप बाहेर काढले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. अन्सारी यांनी वेळीच दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे महिलेचे प्राण वाचविणे शक्य झाले. याबद्दल अन्सारी यांचे वरिष्ठांनी कौतुक केले.



