
हर हर महादेव जयघोषाने दुमदुमणार जारावंडी परिसर
एटापल्ली : तालुक्यातील जारावंडी येथे महाशिवरात्रीच्या दिवशी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभहस्ते भगवान महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, सरपंच सपना कोडापे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप दास, माजी जि.प. सदस्य श्रीनिवास दुलमवार, पेंढरीचे सरपंच पवन येरमे, उपसरपंच सुधाकर टेकाम, विकास कुमरे, मोहन नामेवार, अक्षय पुंगाटी आदी उपस्थित होते.
२६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त सगळीकडे महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगाच रांगा दिसत होत्या. विविध मंदिर परिसरात भाविकांची एकच गर्दी बघायला मिळाली. अश्यात जारावंडी परिसरातील नागरिकांनी मात्र स्वतःच्या गावातच भगवान महादेव मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते भगवान महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देखील केली. विशेष म्हणजे याठिकाणी भव्य मंदिर बांधकाम देखील केले जाणार असून अम्ब्रिशराव आत्राम यांनी मंदिर बांधकामासाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच महादेव मंदिराचे बांधकाम केले जाणार असून पुढील वर्षी महाशिवरात्रीला हरहर महादेव जयघोषाने परिसर दुमदुमून जाणार आहे.
दरम्यान जारावंडी येथे आत्राम यांचे आगमन होताच गावकऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी जारावंडी परिसरातील महादेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजेंनी घेतले शिवलिंगाचे दर्शन
गावात महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून अम्ब्रिशराव आत्राम यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. तसेच गावकऱ्यांनी घेतलेल्या महादेव मंदिर बांधकामाच्या निर्णयाचे स्वागत केले.



